‘ब्राह्मण सभा करवीर’ यांच्या वतीने ‘श्रीरामकथा’ आणि ‘श्रीराम यज्ञ’ यांचे आयोजन

पत्रकार परिषदेसाठी उपस्थित ‘ब्राह्मण सभा करवीर’चे विविध पदाधिकारी

कोल्हापूर – ‘अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर’च्या वतीने २२ ते २८ जून या कालावधीत श्रीरामकथा आणि श्रीराम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील निरूपणकार समर्थभक्त श्री. मकरंदबुवा सुमंत रामदासी हे त्यांच्या रसाळ वाणीतून सुश्राव्य रामकथा साकारणार आहेत. ही कथा प्रतिदिन दुपारी ४ ते रात्री ८.३० या वेळेत राम गणेश गडकरी सभागृह, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे होणार आहे, अशी माहिती ‘ब्राह्मण सभा करवीर’चे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडिलकर, संतोष कोडोलीकर, अशोक जोशी उपस्थित होते. २६ जूनला सकाळी ९ वाजता मंगलधाम येथे श्रीराम यज्ञ होणार आहे.

२१ जूनला विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी सकाळी ९ वाजता मंगलधाम येथून निघून महाद्वार रस्ता, पापाची तिकटी, दक्षिणद्वार मार्गे पुन्हा मंगलधाम येथे संपणार आहे. या दिंडीमध्ये हणबरवाडी येथील ‘माऊली भक्त वारकरी विद्यालय’ येथील ४० बालचमूंचा समूह सहभागी होणार आहे. तरी या पर्वणीचा अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण सभा करवीरच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.

२१ जूनला ग्रंथदिंडी, २२ जूनला ‘कुशलव रामायण गाती’, २३ जूनला अयोध्या वर्णन आणि श्रीरामजन्म, २४ जूनला योगवशिष्ठ, श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचे विवाह आणि अयोध्येत राज्याभिषेकाची सिद्धता, २५ जूनला श्रीराम वनाभिगमन, २६ जूनला अगस्ती – श्रीराम भेट, पंचवटी सीता हरण, २७ जूनला शबरी सुग्रीव मैत्री सुंदरकांड आणि २८ जूनला रावणवध अन् श्रीराम राज्याभिषेक होईल.