संपादकीय : नागरिकशास्त्र केवळ पुस्तकात ?


कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको येथे चालू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत घडलेली एक घटना पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली. डॅलस येथे नेदरलँड्स विरुद्ध जपान हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे अन्य प्रेक्षक उठून जाऊ लागले; परंतु जपानी प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणे स्टेडियममधील आपापल्या जागांजवळ पडलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतरच ते तेथून बाहेर पडले. विशेष म्हणजे चालता न येणार्‍या एका ‘व्हिलचेअर’वरील जपानी नागरिकानेही स्वतःच स्वतःची ‘व्हिलचेअर’ ढकलत ढकलत त्याला दिसेल तेथील कचरा वेचून एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकला. विजयाचा जल्लोष किंवा पराभवाची निराशा, या कशाचाही विचार न करता जपानी नागरिक नेहमीच या कृतीने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि कौतुकास पात्र ठरतात. डॅलस येथेही ‘स्वतःच्या कृतीमुळे इतरांना त्रास होऊ नये आणि सार्वजनिक जागा स्वच्छ रहावी’, ही भावना त्यांच्या वर्तनातून दिसून आली. ही घटना नवीन नाही. यापूर्वी कतार, रशिया आणि ब्राझील येथे झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धांमध्येही जपानी नागरिकांनी अशीच शिस्तप्रियता आणि कर्तव्यदक्षता दाखवली होती. वर्ष २०२२ मध्ये कतारमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्यानंतर जपानी नागरिकांनी तेथील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम अशाच प्रकारे स्वच्छ केले. विशेष म्हणजे हा सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात झाला होता. जपानचा संघ खेळला नसतांनाही जपानी नागरिकांनी कर्तव्य म्हणून स्टेडियमधील कचरा उचलला होता. हे पाहिल्यावर एक प्रश्न असा पडतो की, जपानी नागरिकांना हे का करावेसे वाटते ? सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता हे त्यांना सामूहिक दायित्व का वाटते ?

याचे उत्तर जपानच्या ‘मेइवाकू’ या संस्कृतीत आढळते. स्वतःच्या वर्तनामुळे इतरांना त्रास होणार नाही, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडणार नाही आणि सार्वजनिक जीवनात अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे म्हणजे ‘मेइवाकू !’ ही केवळ जपानी संस्कृती नाही, तर जीवनपद्धत आहे. जपानमध्ये मुलांना लहानपणापासूनच स्वतःचा वर्ग, खेळाचे मैदान आणि सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याची सवय ‘मेइवाकू’ने लावली. त्यामुळे स्वच्छता करणे, हे केवळ स्वच्छता कर्मचार्‍यांचे दायित्व आहे, असा विचार त्यांच्या मनात कधीच येत नाही. याच्या उलट चित्र भारतात गल्लोगल्ली दिसून येते. नागरिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये अधिकार, कर्तव्ये, सामाजिक दायित्व आदींविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आपण सर्व जण ते शिकलो आहोत. विद्यार्थी अजूनही शिकत आहेत; परंतु या मूल्यांचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत कितपत होते ?, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सार्वजनिक ठिकाणी पान-गुटख्याच्या पिचकार्‍या मारणे, कचरा टाकणे, प्लास्टिकच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची वेष्टने फेकणे, रेल्वेस्थानकांवर अस्वच्छता करणे, पर्यटनस्थळांची दुर्दशा करणे, ऐतिहासिक ठिकाणांचे विद्रूपीकरण करणे, हे चित्र आपल्याकडे सर्रास दिसते. स्वतःचे घर स्वच्छ ठेवणारे नागरिक घराबाहेर पडताच त्यांच्या वृत्तीत असा पालट का होतो ?, हे कळायला मार्ग नाही.

प्रश्न मानसिकतेचाच !

अनेकदा काही अतीशहाणे लोक असा युक्तीवाद करतात की, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात जपानसारखी शिस्त आणण्याचा आग्रह धरणे किंवा तशी अपेक्षा करणे, ही अतिशयोक्ती आहे; परंतु हे वस्तूस्थितीला धरून नाही; कारण शिस्त ही लोकसंख्येवर नव्हे, तर नागरिकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारी कुठलीही व्यक्ती ‘मी टाकलेल्या एवढ्या एका प्लास्टिकच्या वेष्टनामुळे काय फरक पडणार आहे?’, असा विचार करते. प्रत्येकच जण असा विचार करतो आणि बघता बघता कचर्‍याचा ढीग साठतो. त्यामुळे हीच मानसिकता आपल्याकडच्या समस्येचे मूळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बरं, हेच लोक हा कचर्‍याचा ढीग उचलला नाही; म्हणून स्थानिक प्रशासनाच्या नावे ओरड करतात. हा विरोधाभास आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचे दायित्व टाळून इतरांकडून मात्र आदर्श वर्तनाची अपेक्षा करते. परिणामी स्वच्छतेचा प्रश्न केवळ प्रशासनाचा बनतो आणि नागरिक स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवतात. आपल्याकडचे प्रशासनही काही तत्पर नाही. सर्व स्थानिक प्रशासनांमध्ये स्वच्छता विभाग असूनही गाव, तालुका, जिल्हा कधीही स्वच्छ होत नाही. त्यामुळे अस्वच्छता ही आज आपल्याकडे दुर्दैवाने सामान्य गोष्ट बनली आहे. अशा ‘अस्वच्छ मानसिकते’तून अनेक पिढ्या गेल्या आहेत आणि जात आहेत. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. जर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा सामूहिक दायित्वाकडे सर्व जण दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार पाहिले, तर मुलांना तेच वागणे योग्य वाटते आणि ते तसे वागू लागतात. आपल्याकडे स्वच्छता केवळ कुणी मंत्री, पंतप्रधान वगैरे येणार असतील, तेव्हाच केली जाते. एकीकडे विद्यार्थ्यांना शाळेत नागरिकशास्त्राचे धडे शिकवले जातात; परंतु बाहेरील वास्तव त्याच्या अगदी उलट असते. त्यामुळे पुस्तकातील मूल्यांची परिणामकारकता अल्प होते. शिक्षण आणि प्रत्यक्ष कृती, यांच्यात हाच भेद आहे. त्यामुळे आपल्यामध्ये ‘मेइवाकू’ संस्कृती रुजवण्याची नितांत आवश्यकता आहे. खरे तर आपल्याकडे पूर्वीपासून ‘सत्यं, शिवं, सुन्दरम्’ हे सांगितलेलेच आहे. येथे सुंदर हे एकाअर्थी स्वच्छतेशी निगडित आहे, असे म्हणायला हरकत नाही. आपण ‘मेइवाकू’च्या २ पावले पुढे आहोत; कारण सत्य आणि सुंदर यांचे नाते भगवंताशी, म्हणजे भगवान शिवाशी जोडले असल्याचे केवळ आपल्याकडेच सांगितले आहे. ‘स्वच्छता हा ईश्वराचा एक गुण आहे’, हे वाक्य आपण आपल्या वाडवडिलांच्या तोंडी निश्चित ऐकले असेल. केवळ आपण याचे अनुकरण केले नाही, त्यामुळे आज आपली ही दुर्दशा झाली आहे.

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी !

तसे पाहिले, तर आपल्याकडेही अनेक गावांत लोकसहभागातून स्वच्छता मोहिबा राबवल्या जातात. शहरांमध्येही स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून संयुक्तपणे स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात; परंतु एवढेच पुरेसे नाही, येथे लोकसंख्येचे कारण सयुक्तिक ठरेल. त्यामुळे पुन्हा या मोहिमा सर्वत्र राबवणे आणि त्यात सहभाग घेणे, हे प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. ही लोकचळवळ व्हावी. जपानी प्रेक्षकांनी उचललेला कचरा हा केवळ स्वच्छतेशी निगडित नाही, तर तो आदर्श नागरिकत्वाचा धडा आहे. तर मग आपणही आता ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावनेतून कचरा उचलणार ना ?

प्रत्येकाने ‘सत्यं, शिवं, सुन्दरम्’ या तत्त्वानुसार आचरण केल्यास स्वतःसह समाज आणि राष्ट्र यांचाही उत्कर्ष होईल !