संपादकीय : खरे विनोद‘वीर’ कोण ?


विनोदी कलाकार प्रणित मोरे याच्या कार्यक्रमातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. प्रणितवर, तसेच त्याच्यासह अन्य एक तरुण आणि एक आधुनिक वैद्य तरुणी यांच्यावरही टीका करण्यात आली. यानंतर घाबरल्याचे नाटक करत आणि उपरती आल्याचे दर्शवत त्या सर्वांनी सार्वजनिक क्षमायाचनेचा सोपस्कार पार पाडला. प्रणितने तर ‘मी या सगळ्याला कसा उत्तरदायी आहे ? मला एक संधी द्या, मी चांगला माणूस बनवून दाखवीन’, असे शाब्दिक गोडवे गाऊन सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ज्यांना अशा विनोदी कलाकारांचा पुळका येत असेल, त्यांना ‘ही संधी देणे कसे आवश्यक आहे’, असेच वाटेल. प्रणितनंतर आणखी एका विनोदी कलाकाराविषयीचे वृत्त पसरले. मधुर विर्ली नामक कलाकाराने एका कार्यक्रमात बलात्कारासारख्या संवेदनशील विषयाचाच विनोद केला होता. त्यामुळे त्याच्यावरही टीका झाली. गेल्या वर्षी रणवीर अलाहाबादिया किंवा समय रैना यांच्याही कार्यक्रमांच्या संदर्भात असे घडले होते. त्यामुळे काही महिने त्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. कालांतराने सर्वकाही सुरळीत झाल्यावर ‘ये रे माझ्या मागल्या’ चालू झाले. प्रणितचेही असेच काहीसे होईल. आजच्या काळातील सर्वच आधुनिक विनोदी कलाकारांना एका मापाने मोजता येणार नाही; पण लोकप्रियतेच्या नावाखाली काही जणांकडून अश्लीलतेचा अतिरेक केला जातो. या प्रकरणांच्या अनुषंगाने मराठी भाषेतील विनोदाची परंपरा, सध्याच्या काळातील विनोदाचा पालटलेला चेहरा आणि समाजाची अभिरूची यांच्या दृष्टीने चर्चा होणे आवश्यक आहे.

मानवी जीवनाचे सौंदर्य दर्शवणारे विनोद !

महाराष्ट्राला विनोदाची अत्यंत समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती यांच्यातील ‘विनोदा’तून करमणूक तर केली जात असे; पण त्यातून समाजप्रबोधन अन् आत्मपरीक्षण हेही साध्य होत असे. व्यक्तीच्या आयुष्यातील दुःखावर या विनोदांमुळे हलकी फुंकर घातली जायची. मराठीतील साहित्यिकांमध्ये पु.ल. देशपांडे, द.मा. मिरासदार, चिं.वि. जोशी आदींनी विनोदाला सुसंस्कृत आणि विचारप्रवर्तक रूप दिले. त्यांच्या साहित्यामुळे लाखो वाचक खळखळून हसले. अजूनही त्यांची प्रकाशने वाचतांना त्या मार्मिक विनोदांतून प्रत्येक जण समाधानी हास्य अनुभवतो. त्या विनोदाचा मनमुराद आनंद घेतो. पु.ल. यांचेही लेखन उपरोधिक असे; पण त्यांनी कधीही कुणा व्यक्तीचा अपमान केला नाही. द.मा. मिरासदार यांनी त्यांच्या कथांतून ग्रामीण जीवनातील गमतीजमती रेखाटल्या; पण त्यातही माणसांचा आदर होता. त्या हास्यातून ते विचारांना प्रवृत्त करत. जीवनातील दुःखे किंवा संघर्ष यांच्यावर त्यांच्या विनोदाचा शिडकावा पडल्यास वाचकांचे मन प्रसन्न होई. या विनोदविरांना लोक किंवा प्रेक्षक यांना हसवण्यासाठी कधीही कमरेखालच्या विनोदांचा आधार घ्यावा लागला नाही, ना त्यांनी कधी तसा विचारही केला. अश्लीलता, लैंगिक सूचकता किंवा अपमानास्पद भाषा यांचा वापर न करता त्यांनी मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. आजही ‘पु.ल. देशपांडे’ हे नाव ऐकताच मराठी माणसाच्या चेहर्‍यावर निखळ हास्य उमटते, ही त्यांच्या शुद्ध विनोदांचीच परिणती आहे. त्यांच्या विनोदात निरीक्षणशक्ती आणि भाषासौंदर्य दडलेले होते. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही तितक्याच आवडीने वाचले जाते. ‘खरेतर सगळे कागद सारखेच; पण त्याला अहंकार चिकटला की, त्याचे प्रमाणपत्र होते’, या त्यांच्या ‘अपूर्वाई’ नावाच्या साहित्यातील एका वाक्यातून त्यांनी समाजातील दिखाऊ प्रतिष्ठेवर उपरोधिक भाष्य केले; पण त्यात अश्लीलता नव्हती. टीका होती; पण व्यक्तीद्वेष नव्हता. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये तर त्यांनी अनेक पात्रे रंगवली. त्यांतही विनोद आहेत; पण अश्लीलता नाही ! उपरोधिकता आहे; पण कटुता नाही. त्यांच्या विनोदांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एखाद्या व्यक्तीची खिल्ली उडवत नसत, तर त्या व्यक्तीला ‘आपण सगळेच थोडेफार असे असतो’, असे दाखवत. त्यामुळे वाचक हसतो आणि त्याच वेळी स्वतःलाही त्या विनोदात पहातो. ही मराठी भाषेतील विनोदप्रकारांची समृद्धता आहे. त्याला गालबोट लागेल, असा एकही शब्द या साहित्यिक मंडळींकडून कधीच आला नाही. त्यांनी समाजाला मनमुरादपणे हसायला शिकवून विनोदी साहित्याचा वारसा जपला.

विनोदातून विकृतीकडे !

आजच्या डिजिटल युगात विनोदाचा स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. विनोद म्हणजे अपमान, विकृती, शिवीगाळ, अश्लीलता, गलिच्छपणा हेच समीकरण झालेले आहे. विनोदाची भाषा पूर्णपणे पालटली आहे. विनोदाचे खरे मर्म समजून घेण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. हल्ली साध्यासोप्या विनोदातून कुणालाच हसू येत नाही; पण कमरेखालचा विनोद केला की, त्यातून आसुरी आनंद घेता येतो. ही विकृतीची परिसीमा आहे. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी इतक्या खालच्या थराला येणे, हे किती चुकीचे आहे ? लाज-लज्जा सर्व काही खुंटीला टांगून अशा कार्यक्रमांना तरुण वर्ग शुल्क भरून मोठ्या प्रमाणात उपस्थित रहातो. कधी एकदा अश्लील विनोद होतो आणि आपण हसतो, असे त्यांना होते. एकाचे ७० टक्के प्रमाणात अश्लील बोलणे झाले, तर त्याला वरचढ ठरण्यासाठी दुसर्‍याकडून बोलतांना अश्लीलतेचे टोक गाठले जाते. ही सर्व मंडळी शिक्षित आहेत बरं का ! शिक्षण ते सद्वर्तन हा मोठा प्रवास संस्काराच्या शिडीनेच पार करता येतो. संस्कार नसतील, तर एखाद्याच्या उच्च विद्याविभूषित असण्याला काहीच मूल्य रहात नाही. यातून शिक्षणाचेच धिंडवडे निघतात. अशी विकृत मानसिकतेची तरुण पिढी देशाला कुठे नेणार आहे, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनावर देशभरात बंदी आणायला हवी.

विनोदी शैली जपा !

पूर्वीचे लेखक आणि साहित्यिक यांचे साहित्य आज लोप पावत चालले असल्याने त्यांची नावेही सध्याच्या पिढीला ठाऊक नाहीत. पांचट विनोद करून सर्वांना हसवणारेच त्यांच्या दृष्टीने खरे साहित्यिक होत. ‘विनोद म्हणजे मानवी जीवनाकडे पहाण्याचा संवेदनशील दृष्टीकोन’ हे शिकवणार्‍या साहित्यिकांची आज समाजाला आवश्यकता आहे. विनोदाची व्याख्या अधिक परिपक्व होण्यासाठी समाजात साहित्यवाचन, वक्तृत्व, नाट्यस्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करायला हवेत. समाजमनाला आरसा दाखवणारा, तणाव न्यून करणारा, विचारांना चालना देणारा तो विनोद ! विनोदाची पातळी घसरू न देता तो दर्जेदार करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यातून समाजात सकारात्मकता, विवेक आणि संवेदनशीलता वाढेल. विनोदाची समृद्ध परंपरा अधिक बळकट करण्यासाठी ती शैली जपायला हवी. विनोदाची हत्या करून चालणार नाही, हे विनोदी कलाकारांनी लक्षात ठेवावे आणि खरे ‘विनोदवीर’ व्हावे !

कुठे निखळ पद्धतीने विनोदी साहित्याचा वारसा जपणारे पूर्वीचे साहित्यिक, तर कुठे आजचे विकृत विनोदी कलाकार !