आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले

राजापूर नगर वाचनालयाच्या व्याख्यानमालेत वैद्य सुविनय दामले यांचे मौलिक मार्गदर्शन !

मार्गदर्शन करतांना वैद्य सुविनय दामले

राजापूर, १५ जून (वार्ता.) – निरामय आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी माणसाने आपल्या दिनचर्येत ‘जगण्यासाठी जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ या ३ गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ वैद्य सुविनय दामले यांनी येथे केले.

राजापूर नगर वाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनासाठी तीन गोष्टी’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी
व्यासपिठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री. प्रभात पाध्ये, कार्यवाह तथा संचालक श्री. जयंत अभ्यंकर आणि संचालक श्री. जयेश हर्डीकर उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल पद्मजा कारेकर यांनी केले, तर आभार संचालक सुहास ओळकर यांनी मानले.

वैद्य सुविनय दामले म्हणाले की,

१. आज समाजात आजार वाढण्यामागे चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी हेच मुख्य कारण आहे. मानवी शरिराचे आणि मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करायला हवे.

२. भूक नसतांना खाणे टाळावे. केवळ वेळेची औपचारिकता म्हणून खाणे पूर्णपणे बंद करावे. दिवसातून मर्यादित वेळाच जेवावे. ‘आयुर्वेदाची पथ्ये पाळणे’, हे शरिरासाठी एका ‘लसीकरणासारखे’ काम करते.

उपस्थित नागरिक.

३. शरिरात पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) पोचण्यासाठी नियमित प्राणायाम आवश्यक आहे, तसेच शरिराला नियमित तेल लावल्यास (अभ्यंग) त्वचा आणि शरीर दीर्घकाळ तरुण आणि उत्साही रहाते.

४. मानसिक शांतीशिवाय शारीरिक आरोग्य अपूर्ण आहे. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार आणि भीती दूर होते, ज्यामुळे शरिरातील संप्रेरकांचे (हॉर्माेन्स) संतुलन उत्तम राहून आंतरिक आनंद मिळतो.

५.  नेहमीच स्फूर्ती, उत्साह आणि सकारात्मकता बाळगायला हवी. आहाराचा  महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी राजासारखा भरपेट नाश्ता, दुपारी राजकुमारासारखे जेवण आणि रात्री भिकार्‍यासारखा अतिशय अल्प आहार घ्यावा.

६. आपल्या परिसरात जे धान्य किंवा फळे मिळतात, तीच खावीत. सकाळी उठल्या उठल्या पाणी पिऊ नये. सूर्यास्तानंतर जेवण करणे टाळावे. ऋतूनुसार आणि प्रदेशानुसार आपली जीवनपद्धती असावी.