मोडकळीस आलेल्या इमारतीत ३१० विद्यार्थी घेत आहेत जीव मुठीत धरून शिक्षण !

छत्रपती संभाजीनगर – ‘सर्व शिक्षा अभियान’अंतर्गत विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा डांगोरा पिटणार्या शासकीय व्यवस्थेचा आणखी एक ढोंगी कारभार समोर आला आहे. येथील पळशी जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत दुरवस्थेत असून खिडक्या मोडलेल्या, पत्रे गंजलेले, वीज आणि शौचालय नसलेल्या अवस्थेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत होत असतांना शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र प्रशासकीय उपेक्षेचा अंधारच आहे. (जिल्हा परिषद प्रशासन शाळेची ही दुरवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे कि नाही ? कि शाळा पडण्याची वाट पहात बसणार ? – संपादक)
न्यायालयाच्या आदेशालाही प्रशासनाची केराची टोपली !
विशेष म्हणजे मागील वर्षी २ न्यायमूर्तींनी या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन दुरवस्थेची पहाणी केली होती. त्यांनी शिक्षण अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाळेच्या दुरुस्तीचे स्पष्ट निर्देश दिले होते. या घटनेला काळ उलटून गेला, तरी सुस्त सरकारी यंत्रणा हललेली नाही. मागील ३ वर्षांपासून नवीन वर्गखोल्यांसाठी पाठवलेला प्रस्ताव शिक्षण विभागात धूळ खात पडला आहे.
शाळेची दुरवस्था दर्शवणारी भीषण वास्तवता !
वर्ष १९७० मध्ये बांधलेल्या या इमारतीच्या ८ वर्गखोल्या पूर्णतः मोडकळीस आल्या आहेत. छताचे पत्रे गंजल्यामुळे पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जागेअभावी विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार दु:स्थिती झालेल्या खोल्यांमध्ये ठेवावा लागतो. तेथे उंदीर आणि घुशी यांचा सुळसुळाट असल्याने गोरगरीब मुलांच्या पोटात जाणारे अन्न वाया जात आहे. मागील ४ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी खराब असल्याने शाळेला स्वखर्चाने पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत.
गोरगरिबांच्या मुलांच्या जिवाशी खेळू नये !
‘राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट आहे. गोरगरिबांची मुले येथे शिक्षण घेतात, त्यांच्या जिवाशी असा खेळ मांडू नये. सुविधा नसलेल्या शाळांचे तातडीने लेखापरीक्षण करून निधी उपलब्ध करून द्यायला हवा.’ – विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती.
कोल्हापूर ‘पासिंग’ वगळता राज्यातील सर्व वाहनांना प्रवेश कर लावण्याचा प्रस्ताव
गोव्यातील भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत उपनिबंधक कार्यालयांची चौकशी होणार
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच