सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !

पालखी सोहळ्यासाठी ‘श्री मार्तंड देव संस्थाना’सह प्रशासन सज्ज

जेजुरी (पुणे) – श्रीक्षेत्र जेजुरी येथे ‘श्री खंडोबा देवा’ची सोमवती अमावास्या १५ जून या दिवशी भरणार आहे. यंदा पालखी सोहळा असल्याने ‘श्री मार्तंड देव संस्थाना’सह सर्व शासकीय यंत्रणांकडून पालखी सोहळ्याची सिद्धता करण्यात येत आहे. पाणीपुरवठा, फिरती शौचालये आदी सुविधांसाठी नगरपालिकेने व्यवस्था केली आहे. पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

१. श्री खंडोबा देवाची पालखी कर्‍हा नदीवर जाण्यासाठी पहाटे २ वाजता प्रस्थान ठेवणार आहे.

२. कर्‍हा नदीवर पालखीतील खंडोबा, म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींना १५ जून या दिवशी सकाळी ६ वाजता स्नान घातले जाणार असून सकाळी ८ वाजता पालखी  खंडोबा गडावर परत येईल.

३. सोमवती अमावास्या ही दीड वर्षाने अधिक मासात आल्याने भाविक आणि ग्रामस्थ यांमध्ये उत्साह दिसून येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४. मुख्य रस्ता आणि पायरी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी सांगितले.