जिल्हा परिषद बांधकाम विभागात खोट्या स्वाक्षर्‍यांनी लाखो रुपये काढण्याचा प्रयत्न

संबंधितांवर लवकरच कारवाई होणार

सिंधुदुर्गनगरी – जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍यांचा वापर करून विकासकामांची तब्बल १७ लाख १९ सहस्र रुपयांची देयके आणि अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून एका ठेकेदारावर खोट्या स्वाक्षर्‍यांचे दायित्व निश्चित करण्यात आले आहे. संबंधित कार्यकारी अभियंता सध्या सुटीवर असून तो कामावर रूजू झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.

याविषयी कामत यांनी सांगितले की, एकूण १३ देयकांच्या माध्यमातून निधी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांपैकी एक नियमित विकासकामाचे देयक, तर उर्वरित १२ देयके अनामत रक्कम परताव्याशी संबंधित होती. यातील ६ लाख ७६ सहस्र ५८८ रुपयांचे नियमित देयक संमत होऊन रक्कम संबंधिताला देण्यात आली; मात्र अनामत रकमेची सर्व देयके वेळीच संशयाच्या भोवर्‍यात सापडल्याने ती थांबवण्यात आली. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ चौकशी चालू केली.