‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवत असतांना स्वयंपाकघरात सेवा करत आहे. तेव्हा मला ‘पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत) या आश्रमात राहून समष्टी साधना कशी करतात ?’, हे शिकायला मिळाले. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ याप्रमाणे पू. रेखाताई यांचे सतत स्वयंपाकघर आणि आश्रम येथील साधक यांच्याकडे लक्ष असते. पू. तार्ईंना सतत साधकांच्या प्रगतीचा ध्यास आसतो. स्वयंपाकघरात सेवा करतांना मला त्यांचे लक्षात आलेले व्यष्टी आणि समष्टी गुण येथे देत आहे.

१. पू. रेखाताई यांचे व्यष्टी गुण
१ अ. नम्रता : २२.९.२०२५ या दिवशी पू. ताईंचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी साधक (लहान आणि वयस्कर) जमले होते. पू. ताईंसाठी एक आसंदी ठेवली होती; पण त्या शेवटपर्यंत आसंदीमध्ये बसल्या नाहीत.
(‘वयस्कर साधक अनुभवाने मोठे असतात. ते प्रक्रियेला आले असले, तरी त्यांच्या वयाचा मान ठेवायला हवा’, याची मला जाणीव असल्याने मी त्यांच्या समोर आसंदीमध्ये बसले नाही.’ – पू. रेखा काणकोणकर)

१ आ. इतरांचा विचार करणे : एकदा पू. ताईंनी मला उकडलेले बटाटे स्वयंपाक विभागातून भाजी विभागामध्ये नेण्यास सांगितले होते. बटाटे गरम असल्यामुळे ‘ते नेतांना मला भाजू शकते’, याचा विचार करून पू. ताईंनी त्याविषयी मला एक कल्पना सुचवली. ज्या कुकरमध्ये ते बटाटे उकडले होते, त्या कुकरवर जाळीचे भांडे ठेवून त्यात बटाटे ठेवल्यामुळे कुकरच्या हँडलला धरून मला ते घेऊन जाणे सोपे झाले.
१ इ. संतांप्रती भाव : संतांना नेहमी ‘त्यांची प्रकृती आणि पथ्य यांनुसार गरम अन्न कसे मिळेल ?’, यांकडे पू. ताईंचे कटाक्षाने लक्ष असते. पू. ताई संतांचे जेवण बनवणार्या साधकांना आवश्यकतेनुसार लगेच साहाय्य करतात. संतांसाठी अन्न बनवणार्या साधकांकडून चुका घडू नयेत, यांसाठी पू. ताई सदैव सतर्क असतात.
१ ई. साधकांना सेवेत साहाय्य देणे : स्वयंपाकघरात मोठी भांडी जागेवर व्यवस्थित लावण्याची सेवा करण्यासाठी अल्प साधक आहेत. तेथे सेवा करणार्या एका साधकाला अवजड भांडी उचलावी लागू नयेत; म्हणून पू. ताईंनी त्या साधकाच्या साहाय्याला अन्य एका साधकाला पाठवले. दुसर्या एका साधकाला काही दिवसांतच ‘कंबर आणि पाठदुखी’ हा त्रास चालू झाला. हे लक्षात आल्यावर पू. ताईंनी ‘त्या साधकाची अवजड साहित्य उचलण्याची सेवा बंद करून बसून भाजी धुणे आणि चिरणे’, अशा सेवा दिल्या.
१ उ. स्पंदने जाणवणे
१ उ १. साधकाची झालेली चिडचिड आणि मनाची स्थिती ओळखणे : एका प्रसंगात एका सहसाधकाने त्याला सांगूनही पूर्वीचीच चूक पुन्हा केली होती. हे मला स्वीकारता आले नाही. मी केवळ माहितीसाठी पू. ताईंना सहसाधकाची चूक सांगितली आणि सेवेला निघून गेलो. काही वेळाने पू. ताईंनी मला विचारले, ‘‘दादा, मघाशी तुमची चिडचिड झाली होती का ?’’ त्या वेळी मी ‘नाही’ म्हटले; कारण मला त्याची जाणीव नव्हती. काही वेळाने मला माझ्या मनाची स्थिती ओळखता आली. प्रत्यक्षात सहसाधकाच्या चुकीमुळे माझी चिडचिड झाली होती.
२. पू. रेखाताई यांचे समष्टी गुण
२ अ. साधकाची ‘प्रकृती, कौशल्य आणि क्षमता’ यांचा विचार करून सेवा देणे : पू. रेखाताई साधकांना स्वयंपाकघरात सेवा देतांना ‘साधकाची प्रकृती, त्याची क्षमता आणि त्याचे कौशल्य’ यांचा विचार करून सेवा देतात, उदा. काही साधकांना नियोजनाची सेवा देणे, काही साधकांना इतरांकडून सेवा करवून घेणे किंवा काही साधकांना प्रत्यक्ष सेवा करण्यास सांगणे’, असे नियोजन करतात.
२ आ. साधकांमध्ये कौशल्य निर्माण करणे
२ आ १. साधकाला सेवा शिकवणे : पू. ताई सेवा देण्यापूर्वी साधकाला ती सेवा व्यवस्थित समजावून सांगतात. आवश्यकता असल्यास ती सेवा करणार्या अन्य साधकाच्या समवेत संबंधित साधकाच्या सेवेचे नियोजन करतात. त्यातून त्या साधकाला सेवेच्या संदर्भातील बारकावे शिकवतात आणि मग ती सेवा त्याला हस्तांतरित करतात.
२ आ २. साधकांचा वेळ आणि सेवा यांचे नियोजन करणे : जेव्हा साधक सकाळच्या सत्रातील सेवा संपवून निघतात, तेव्हा पू. ताई त्यांना पुढील सेवेचे नियोजन आणि वेळ सांगतात. त्या प्रत्येक साधकाच्या सेवेचे नियोजन करतात. त्यामुळे साधकांचा वेळ वाया जात नाही.
२ आ ३. साधकांच्या कौशल्याचा त्याला साधनेत लाभ करून देणे : एखादी सेवा करण्यासाठी एखादे कौशल्य आवश्यक असेल, तर पू. ताई साधकाला त्याचा अभ्यास करायला सांगतात, उदा. दुधाची सेवा करण्यासाठी साधिकेला ‘मिक्सर’ चालवणे किंवा त्याची स्वच्छता करणे, दही लावणे, दुधाची मागणी करणे इत्यादी. त्याचप्रमाणे पू. ताई अन्य यंत्र आणि उपकरणे चालवण्याच्या संदर्भात साधकाला एकाच वेळी अनेक सेवा सांगतात.
२ आ ४. साधकांमध्ये नेतृत्व निर्माण करणे : पू. ताई ‘साधकांमध्ये नेतृत्व निर्माण व्हावे’; म्हणून सतत प्रयत्नरत असतात. बर्याच वेळा पू. ताई भात लावणार्या साधकाला साधकांच्या संख्येनुसार ‘तांदूळ किती घ्यावे ? डाळ किती घ्यावी ?’ इत्यादींविषयी सांगून अभ्यास करवून घेतात. तेव्हा ‘पू. ताई आपत्काळाच्या दृष्टीने स्वयंपाक करू शकणार्या साधकांची एक फळी निर्माण करत आहेत’, असे मला वाटते.
२ इ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या न्यायानुसार स्वतः सेवा करणे
२ इ १. परिस्थिती स्वीकारून सेवा पूर्ण करणे : आश्रमात आदल्या दिवशी ‘उद्याचे साधक, पाहुणे इत्यादी मिळून किती जण प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यासाठी असतील’, याचे नियोजन केलेले असते. त्यानुसार स्वयंपाकघरात प्रसाद आणि महाप्रसाद बनवला जातो; परंतु बर्याच वेळा अकस्मात् बाहेर गावाहून साधक किंवा पाहुणे येतात. त्यामुळे महाप्रसाद अपुरा पडू शकतो. हे पू. ताईंच्या लक्षात आल्यावर ‘त्या परिस्थिती स्वीकारतात आणि त्या स्वतः पुढाकार घेऊन काही साधकांच्या साहाय्याने सर्वांना पुरेसा होईल’, असा स्वयंपाक वेळेवर बनवतात.
२ इ २. ‘दिसेल ते कर्तव्य’ या न्यायानुसार स्वतः सेवा करणे : एक दिवस मी ‘ओव्हन’मध्ये कांदा, खोबरे आणि लसूण भाजण्यासाठी ठेवले होते. पू. ताईंनी मला ते पदार्थ खाली-वर करायला सांगितले होते. तेव्हा मी पू. ताईंना सांगितले, ‘‘मी ही सेवा पूर्वी कधी केलेली नाही.’’ यावर पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘ठीक आहे. तुम्ही तुमची सेवा करा. ही सेवा मी करते.’’ त्यानंतर त्यांनी ती सेवा स्वतः पूर्ण केली. यांवरून ‘त्या ‘दिसेल ते कर्तव्य’ या न्यायानुसार सेवा करतात’, हे माझ्या लक्षात आले.’
– श्री. विनायक बागवडे, ढवळी, फोंडा, गोवा. (२.१.२०२५)
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटील यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !