गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर गोकुळ दूध संघाचा खुलासा

कोल्हापूर – ‘कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ’ अर्थात् गोकुळने घेतलेले ‘हलाल’ प्रमाणपत्र रहित करावे, या मागणीसाठी २९ मे या दिवशी गोकुळच्या मुख्य कार्यालयात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यावर श्री. शिवानंद स्वामी यांच्या नावे गोकुळने उत्तर दिले आहे. त्या उत्तरात गोकुळने ‘गोकुळची सर्व उत्पादने पूर्णपणे सुरक्षित, शुद्ध आणि उच्च दर्जाची आहेत. गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेविषयी गोकुळ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही’, असे नमूद केले आहे.

१. गोकुळचे सर्व दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे एफ्.एस्.एस्.ए.आय. (Food Safety and Standards Authority of India (FSSAI)), आय.एस्.ओ. २२००० (ISO 22000), इआयसी (EIC) आणि एच्.ए.सी.सी.पी. (HACCP) यांसारख्या गुणवत्ता अन् अन्नसुरक्षा सुनिश्चित करणार्‍या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे काटेकोर पालन करून सिद्ध करण्यात येतात.

२. दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील परस्पर विश्वास, आपुलकी अन् जिव्हाळा हेच गोकुळचे मुख्य बळ आहे आणि हा विश्वास अबाधित राखण्यास संघ सदैव कटीबद्ध आहे. (दूध उत्पादक संघ हा विश्वास राखण्यास कटीबद्ध आहे, तर जेव्हा ‘हलाल’ प्रमाणपत्र घेण्यात आले, तेव्हाच हे का घोषित करण्यात आले नाही ? गोकुळचे अधिकाधिक पुरवठादार हे हिंदु दूध उत्पादक शेतकरी असून त्यांना ही माहिती अद्याप का समजली नाही ? – संपादक)

३. ‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ काही देशांमध्ये निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक/व्यावसायिक प्रमाणपत्र आहे. (‘हलाल’चे प्रमाणपत्र मुसलमान संस्थाच देतात आणि ते देणार्‍या ‘जमियत उलेमा हिंद’  संघटनेवर आतंकवाद्यांचे समर्थन केल्याचा आरोप आहे, त्यावर ‘गोकुळ’चे काय म्हणणे आहे ? आतंकवाद्यांचे जाहीर समर्थन करणार्‍या, त्यांना अधिवक्ता पुरवणार्‍या मुसलमान संस्थेकडून ‘गोकुळ’ने प्रमाणपत्र का घेतले ? असे करणे म्हणजे आंतकवादी कारवायांचे समर्थनच नाही का ? – संपादक)

४. सद्यःस्थितीत गोकुळ संघाकडून कोणत्याही उत्पादनाच्या निर्यातीसंदर्भात कोणतीही कार्यवाही चालू नाही. त्यामुळे संबंधित प्रमाणपत्राचा वापरही करण्यात येणार नाही.

५. आपल्या निवेदनातील सूत्रांची योग्य ती नोंद घेण्यात आलेली असून याविषयी कोणताही अपसमज राहू नये.

संपादकीय भूमिका

आतंकवादी संघटनांचे समर्थन करणार्‍या, त्यांना अधिवक्ता देणार्‍या ‘जमियत उलेमा हिंद’सारख्या संघटनेकडून ‘गोकुळ’ने ‘हलाल’ प्रमाणपत्र का घेतले ? याचाही खुलासा आवश्यक आहे ! ते सोडून भलत्याच विषयाची माहिती देणे गोकुळ संघाला शोभत नाही !