Negligence In Census Work : कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही !

महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकार्‍यांचा सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चेतावणी !

(प्रगणक म्हणजे जनगणना करणारी व्यक्ती)


मुंबई – महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि घरगणना’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना अधिकृत पत्राद्वारे महत्त्वपूर्ण आदेश दिला. ‘क्षेत्रीय कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची अत्यंत गांभीर्याने नोंद घेतली जाईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या निदर्शनास आले की, प्रगणकांवरील कामाचा ताण न्यून करण्यासाठी आणि माहितीची अचूकता वाढवण्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र अनेक प्रगणक प्रत्यक्ष घरभेटीच्या वेळी नागरिकांकडे सखोल चौकशी न करता घाईघाईने माहिती भरत आहेत. यामुळे नागरिकांनी स्वतःहून नोंदवलेल वैध माहिती मुख्य ‘डेटाबेस’मध्ये (प्रणालीत) समाविष्ट होण्यापासून सुटत आहे. परिणामी प्रशासनाला एकाच कामाची पुनरावृत्ती करावी लागत आहे.

प्रत्यक्ष घरभेटी करणे, नकाशे सिद्ध करणे, आणि घरांची सूची सिद्ध करणे यांसाठी ३० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रगणकांनी क्षेत्रात पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.

प्रश्नावलीतील काही प्रश्नांविषयी प्रगणकांमध्ये संभ्रम आहे, उदा. डोंगराळ भागातील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, शौचालयाची उपलब्धता आणि मानवाद्वारे मल वाहून नेणे, सेप्टिक टँक साफ करणे, यातील तांत्रिक भेद न समजल्यामुळे चुकीच्या नोंदी होत आहेत. ‘स्मार्टफोन’ नसतांनाही संगणकीय माहितीजाल (इंटरनेट) उपलब्ध असल्याच्या परस्परविरोधी नोंदी ॲपमध्ये केल्या जात आहेत. या चुका सुधारण्याचा आदेश संबंधितांना देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

असा आदेश देण्याची वेळ का येते ? प्रगणक त्यांचे दायित्व का पार पाडत नाहीत ? प्रशासनाने प्रगणकांना जनगणनेच्या कामाच्या गुणवत्तेविषयी आधीच सूचित केले नाही का ?