श्री सप्तश्रृंगी गडाचा कारभार नाशिक धर्मादाय सहआयुक्तांकडे !

  • राज्यपालांच्या आदेशानुसार शासनाकडून नियुक्ती !

  • सत्र न्यायाधीश आणि तहसीलदार यांचे नियंत्रण संपुष्टात !

नाशिक – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगीदेवीच्या न्यासाचा कारभार पहाण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार शासनाचे उपविधी सल्लागार आणि उपसचिव डॉ. कुंवरसिंह सिंघेल यांनी नाशिकच्या वरिष्ठ धर्मादाय सहआयुक्तांची या पदावर नियुक्ती केली आहे. यामुळे ‘सप्तश्रृंगी गड न्यासा’चे नियमित कामकाज आणि व्यवस्थापन याचे सर्व दायित्व आता धर्मादाय सहआयुक्तांकडे सोपवण्यात आले असून जिल्हा सत्र न्यायाधीश अन् तहसीलदार यांचे यापूर्वी असलेले नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात आले आहे.

यापूर्वी सप्तश्रृंगी गडावरील न्यासाचा संपूर्ण कारभार पहाण्याचे दायित्व हे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याद्वारे ५ विश्वस्त नेमून पार पाडले जात होते. त्यासमवेतच स्थानिक तहसीलदार हे कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून या कारभारावर नियंत्रण ठेवत. ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्या जागी नवीन विश्वस्त नियुक्त करून कारभार करण्याची परंपरा आजवर चालू होती; मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार जुनी व्यवस्था पालटण्यात आली आहे.

देवीचे धार्मिक विधी आणि दर्शन यांचे नियोजन पूर्ववत् रहाणार ! 

गडावरील देवीच्या धार्मिक परंपरेला कोणताही धक्का लागणार नाही. गडावरील भाविकांच्या दर्शनरांगांचे नियोजन, नियमित पूजाविधी आणि आरती यांवर नवीन निर्णयाचा परिणाम होणार नाही. पूर्ववत् परंपरेनुसार आणि वेळेनुसारच दर्शन, आरती आणि पूजाविधी चालू रहातील. गडाचे सर्व नियंत्रण आता सह-धर्मादाय आयुक्तांकडे असणार असून त्यांच्या निर्देशांनुसार पुढील विश्वस्त मंडळ कसे आणि कोणत्या पद्धतीने नियुक्त होणार, हे निश्चित केले जाईल.

संपादकीय भूमिका

  • सत्रन्यायाधीश आणि तहसीलदार यांच्याकडून मंदिराचा कारभार योग्य होत नसतांना सरकारीकरणाचा घाट का ?
  • श्री सप्तश्रृंगीदेवी हे कोट्यवधी हिंदूंचे जागृत देवस्थान आहे. गडाचा कारभार धर्मादाय सहआयुक्तांकडे गेल्यामुळे प्रशासनाने केवळ महसूल आणि व्यवस्थापन यांच्यावर लक्ष न ठेवता गडाचे पावित्र्य, हिंदु धर्मशास्त्रानुसार होणारे विधी आणि भाविकांना मिळणार्‍या सुविधा यांकडे लक्ष द्यावे. 
  • मंदिरांचा पैसा केवळ हिंदु धर्माचे कार्य आणि गडाचा विकास यांच्यासाठी वापरला जावा, हीच सर्व हिंदु भाविकांची अपेक्षा आहे !