टी.एम्.व्ही.आर्. प्रक्रियेने वृद्धाला मिळाले जीवदान

रत्नागिरी – हृदयरोगतज्ञांनी ७२ वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक आणि मिनिमली इन्वेसिव्ह ‘ट्रान्सकॅथेटर माइट्रल व्हॉल्व्ह-इन-व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टी.एम्.व्ही.आर्.) प्रक्रिया मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथे यशस्वीरित्या पार पाडली.

वर्ष २०१४ मध्ये बसवलेला बायोप्रोस्थेटिक माइट्रल व्हॉल्व्ह कालांतराने खराब झाल्याने रुग्णाला गंभीर श्वसनाचा त्रास, हृदय निकामी होण्याच्या तक्रारी आणि वारंवार रुग्णालयात भरती व्हावे लागत होते. तपासणीत व्हॉल्व्हमध्ये अडथळा आणि गळती आढळून आली. वाढते वय आणि पूर्वीची हृदय शस्त्रक्रिया लक्षात घेता पुन्हा ‘ओपन हार्ट सर्जरी’ धोकादायक होती. त्यामुळे डॉक्टरांनी उजव्या पायातील शिरेतून कॅथेटरच्या साहाय्याने नवीन व्हॉल्व्ह बसवण्याचा निर्णय घेतला.

अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. उपचारानंतर नवीन व्हॉल्व्ह सुरळीत कार्यरत असून रुग्णाच्या श्वासोच्छ्वासात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याविषयी माहिती देताना मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील एचओडी आणि सल्लागार डॉ. अभिजित जोशी म्हणाले, ‘‘ही प्रक्रिया उजव्या पायातील शिरेतून कॅथेटरच्या सहाय्याने करण्यात आली. अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्यान हृदयापर्यंत पोचून खराब झालेल्या जुन्या व्हॉल्व्हमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत अचूक पद्धतीने पूर्ण करण्यात आली.’’