Cow Slaughter Ban : राष्ट्रव्यापी गोहत्याबंदी करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही ! – केंद्र सरकार

केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल

नवी देहली – गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची, तसेच देशव्यापी गोहत्याबंदी लागू करण्याची मागणी वेळोवेळी विविध संघटना अन् खासदार यांच्याकडून केली जाते. नागरिकही अर्ज आणि निवेदने देऊन अशा उपाययोजना करण्याची मागणी करतात; मात्र सध्यातरी असा कोणताही प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर नाही, असे केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी स्पष्ट केले.

१. राज्यनिहाय स्थिती पहाता गोहत्येसंदर्भात त्या-त्या राज्यांत कायदे भिन्न आहेत. स्थानिक परिस्थिती आणि आवश्यकता यांनुसार राज्य सरकारे निर्णय घेतात, असे मेघवाल म्हणाले.

२. अलीकडेच बंगालच्या भाजप सरकारने राज्याच्या वर्ष १९५० च्या कायद्यानुसार जनावरांच्या कत्तलीवरील नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यासाठी पावले उचलल्याचा संदर्भही त्यांनी दिला.

गोहत्याबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची इच्छाशक्ती आवश्यक !

कायदेशीरदृष्ट्या गोहत्याबंदी कायद्यास काही अडथळे आहेत. उदाहरणार्थ ‘गायीचे रक्षण हा विषय केंद्राचा नाही, तर राज्याच्या अखत्यारीत असणे’, ‘राज्यघटनेतील कलम ४८ नुसार गोरक्षण केले पाहिजे’, हे मार्गदर्शक तत्त्वात बसते, तो मूलभूत अधिकार नाही’ इत्यादी. अर्थात् जे सरकार अशक्यप्राय वाटणारे कलम ३७० रहित करू शकते, ते गोहत्येवर राष्ट्रव्यापी बंदी आणूच शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • गोमातेचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार प्रत्यक्ष काय करत आहे, हेही सरकारने स्पष्ट करावे, असेच हिंदूंना वाटते !
  • गोहत्याबंदी करण्यासाठी देशभरात ‘गोसम्मान आवाहन अभियान’ ही अत्यंत पवित्र मोहीम चालू आहे. अशा वेळी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करण्याऐवजी अशा प्रकारचे विधान करणे बृहद् हिंदु समाजाला अपेक्षित नाही !