नेपाळ सीमा ते गोव्याच्या किनार्यांपर्यंत पसरलेल्या आंतरराज्य अमली पदार्थाचे साम्राज्य उघडकीस !

पणजी, ३१ मे (वार्ता.) – उत्तरप्रदेश आणि नेपाळ या दुर्गम सीमाभागातून आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या एका अत्यंत धोकादायक आणि संघटित अमली पदार्थ तस्करीचे साम्राज्य गोवा पोलिसांची गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेशचे विशेष कार्यदल यांनी अत्यंत शिताफीने उघडकीस आणले आहे. गोव्यातील मालीम-बेती परिसरात काही दिवसांपूर्वी केलेल्या एका मोठ्या कारवाईची पाळेमुळे थेट भारत-नेपाळ सीमेवरील उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यापर्यंत पोचली आहेत. या संयुक्त मोहिमेत पोलिसांनी बहराइच येथील दर्गा शरीफ परिसरातून इखलाक अहमद उपाख्य मन्ना मलिक या अमली पदार्थ माफियाला कह्यात घेतले आहे. या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याच्या अटकेमुळे अमली पदार्थांच्या काळ्या बाजारातील एका मोठ्या पुरवठा साखळीला पोलिसांनी मोठा सुरुंग लावल्याचे समजले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा प्रारंभ गोव्यातील मालीम-बेती येथील मासळी मार्केट परिसरात झाला होती. गुन्हे शाखेला या भागात मोठ्या प्रमाणात अत्यंत महागड्या अमली पदार्थांची देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने २० मे या दिवशी पहाटे ३.४० ते सकाळी ६.३० या वेळेत परिसरात सापळा रचला. या वेळी पहाटेच्या अंधारात संशयास्पदरित्या दुचाकीवरून फिरणार्या अर्जुन बिश्वकर्मा (वय ३६ वर्षे) आणि चेतकांत ओली (वय २५ वर्षे) या २ नेपाळी युवकांना पोलिसांनी अडवले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ७ लक्ष ९७ सहस्र रुपये किमतीचे ३९.८८ ग्रॅम उच्च दर्जाचे हेरॉईन सापडले. पोलिसांनी हेरॉईन, दुचाकी आणि भ्रमणभाष यांच्यासह एकूण ८ लक्ष ८८ सहस्र ८०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेऊन दोन्ही नेपाळी तस्करांना अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गजाआड केले. गुन्हे शाखेने कसून केलेल्या चौकशीत एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा शोध लागला. गोव्यात पोचणार्या या हेरॉईनचा मुख्य पुरवठादार उत्तरप्रदेशातील बहराइच येथील इखलाक अहमद उपाख्य मन्ना मलिक असल्याचे अन्वेषणात समोर आले. गोव्यात नोंद असलेल्या या प्रकरणात मन्ना मलिक हे मुख्य नाव समोर आल्यानंतर गोवा पोलिसांनी तातडीने उत्तरप्रदेशामधील विशेष कार्यदलाला संपर्क साधून साहाय्य मागितले. उत्तरप्रदेश पोलिसांनी मन्ना मलिकवर तांत्रिक साहाय्याने पाळत ठेवली. ३० मे २०२६ या दिवशी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गोवा गुन्हे शाखेचे निरीक्षक महेश गडेकर आणि उपनिरीक्षक माधव नाईक यांच्या संयुक्त पथकाने बहराइचच्या दर्गा शरीफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्सूरगंज भागातून मन्ना मलिकला अत्यंत शिताफीने नाकाबंदी करून कह्यात घेतले. त्यानंतर ३१ मे या दिवशी त्याला ट्रान्झीट रिमांडवर (दुसर्या राज्यातील पोलिसांकडे आरोपीला हस्तांतरित करायची प्रक्रिया) गोव्यात आणण्यात आले.
कोण आहे मन्ना मलिक ?
मन्ना मलिक वर्ष २०१२ पासून गुन्हेगारी जगतात सक्रीय असून त्याच्यावर हत्या, दरोडा, दरोड्याची पूर्वसिद्धता करणे, प्राणघातक आक्रमण करणे आणि वर्ष २०१४ मधील ‘गँगस्टर अॅक्ट’, अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वर्ष २०१८ मध्ये मन्ना मलिक याचा ‘वसीम उपाख्य मिट्टी तेल’ या स्थानिक दलालाशी संपर्क आला आणि तेथून त्याने अमली पदार्थांच्या व्यापारात उडी घेतली. त्यानंतर त्याने नेपाळमधील ‘अर्जुन’ नावाच्या मुख्य तस्कराशी संधान साधून हेरॉईनचा थेट पुरवठा मिळवणे चालू केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा माल बहराइचवरून थेट गोव्यात पाठवण्यासाठी खासगी वाहनाचा वापर न करता सामान्य आंतरराज्य ट्रॅव्हल्स बससेवेचा वापर केला जात होता आणि यामुळे पोलिसांना संशय येत नव्हता.
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !