‘ऑपरेशन सिंदूर २’साठी भारतीय सैन्य सज्ज ! : Indian Army Chief

सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

पुणे – ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही. सध्या केवळ युद्धविरामासारखी स्थिती आहे. आवश्यकता भासल्यास भारतीय सैन्याच्या तीनही शाखा ‘ऑपरेशन सिंदूर २’साठी पूर्णपणे सज्ज आहेत, असे सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एन्.डी.ए.च्या – नॅशनल डिफेन्स ॲकेडमीच्या) १५० व्या ‘पासिंग आउट परेड’मध्ये रिव्ह्यूंग ऑफिसर (पुनर्विलोकन अधिकारी) म्हणून जनरल द्विवेदी उपस्थित होते. या सोहळ्यात ‘सुखोई ३० एम्.के.आय.’ लढाऊ विमाने, आणि चेतक अन् सारंग हेलिकॉप्टर पथक आदींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. संचलनामध्ये १२ मित्र राष्ट्रांतील २४ परदेशी छात्र सैनिकांचाही सहभाग होता.

भविष्यातील युद्धांचे स्वरूप आणि तंत्रज्ञान याविषयी संबोधित करतांना ‘भविष्यातील लढाया केवळ भूमी, हवा आणि समुद्र यांच्या पुरत्या मर्यादित न रहाता त्या सायबर, अंतराळ आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये लढल्या जातील’, असे सैन्यदलप्रमुखांनी सांगितले.

सैन्यदलप्रमुखांनी सांगितलेली सूत्रे

१. आधुनिक युद्ध पूर्णपणे पारदर्शक झाले असून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर २४ घंटे लक्ष ठेवले जात आहे.

२. भारतीय सेना ‘डीकेड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ (वर्ष २०२३ ते २०३२ या दशकात भारतीय सैन्य अधिक आधुनिक चपळ आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज बनवण्याचे काम चालू आहे.) या उपक्रमांतर्गत भविष्यातील आव्हानांसाठी आधुनिक सैनिकी संरचनेत पालट करत आहे.

३. माहिती युद्ध जिंकण्यासाठी देशातील नागरिक आणि संस्था यांच्यातील परस्पर विश्वास अत्यंत आवश्यक आहे.

४. ‘ऑपरेशन सिंदूर’ने एक मानक आखून दिला असून भारत कोणत्याही चिथावणीला चोख प्रत्त्युत्तर देतो, हे त्याने जगाला दाखवून दिले आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पुन्हा हिंदूंना ठार मारल्यानंतर भारत ‘ऑपरेशन सिंदूर’ करणार. यापेक्षा आतंकवाद्यांनी हिंदूंवर कधीच आक्रमण करू नये, यासाठी पाकला मुळासकट नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ केले पाहिजे ! आक्रमण हेच बचावाचे शस्त्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !