आश्रम स्तरावरील सेवा करण्याच्या संदर्भात साधकाचे झालेले चिंतन आणि त्या सेवा मनापासून करू लागल्यावर साधकाला जाणवलेली सूत्रे !

‘पूर्वी मी आश्रम स्तरावरील सेवा (स्वयंपाकघरात साहाय्य, खोल्यांची स्वच्छता, सुरक्षेशी संबंधित सेवा) मनापासून करत नव्हतो. मी नामजपादी उपाय, इतर सेवा आणि वैयक्तिक गोष्टी यांनाच प्राधान्य देत होतो. ‘माझ्या मनात रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आहे’, असा भाव अल्प होता. मला कुठल्याच सेवेत आनंद मिळत नव्हता किंवा उत्साह वाटत नव्हता. मी याविषयी चिंतन करून प्रयत्न चालू केले. मी परिस्थिती मनापासून स्वीकारून प्रयत्न चालू केले, तेव्हा माझ्यात झालेले पालट गुरुचरणी अर्पण करतो.

सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा

१. वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून सेवा करायला प्राधान्य देणे आणि स्थिरता अनुभवणे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव निर्माण होणे 

श्री. विठ्ठल कदम

‘मी रामनाथी येथील आश्रमात गुरुप्राप्ती होण्यासाठी आलो आहे. मला जी सेवा मिळेल, ती मनाचा अडथळा न आणता माझ्या क्षमतेनुसार भावपूर्ण आणि परिपूर्ण करायला हवी’, असे विचार माझ्या मनात सतत असतात. मला ऐन वेळी अनेक सेवा आल्यासही ‘हा माझ्या गुरुदेवांचा आश्रम आहे. मला त्या सेवा करायच्या आहेत’, असा माझा भाव असतो. मी माझ्या वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून सेवेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी स्थिरता अनुभवतो. माझ्या मनात गुरुदेवांच्याप्रती भाव निर्माण होतो आणि मला सेवा करतांना आनंद मिळतो.

२. ‘इतरांचा विचार करून गुरूंना अपेक्षित अशी सेवा करायची आहे’, असे वाटणे 

‘मी माझी आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आश्रमात आलो आहे. ‘सेवा भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे’, हे माझ्या गुरूंना अपेक्षित आहे. मला प्रत्येक सेवा मनापासून करायची आहे. एखाद्या साधकाला सेवेची अडचण असल्यास त्याला समजून घेऊन आणि परिस्थिती स्वीकारून मला ती सेवा करायची आहे’, असे विचार गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात येतात.

३. सेवा करण्याची मनाची सिद्धता असल्यास सेवा सहजतेने होत असल्याचे अनुभवता येणे 

‘ज्या आश्रमात साक्षात् श्रीविष्णूचा अवतार (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) वास करतो, त्या आश्रमात (वैकुंठात) कोणतीही सेवा करण्यासाठी मनाची सिद्धता असणे अपेक्षित आहे. आपल्या मनाची सिद्धता असल्यास ती सेवा साक्षात् गुरु आपल्याकडून करून घेणार आहेत’, असा भाव माझ्यात निर्माण होतो. नंतर ‘दिलेली सेवा माझ्याकडून सहजतेने  होते’, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे.

४. आश्रम स्तरावरील सेवा करण्याऐवजी इतर सेवा करायला प्राधान्य दिल्यास ‘हा गुरूंचा आश्रम आहे’, हा भाव अल्प आहे’, असे वाटणे 

‘इतर सेवा करायला प्राधान्य देणे आणि आश्रम स्तरावरील सेवा करायला प्राधान्य न देणे, म्हणजेच ‘हा गुरूंचा आश्रम आहे’, हा माझा भाव अल्प आहे’, असे मला वाटते. माझ्या मनात जेव्हा इतर विचार असतात किंवा माझ्याकडून परिस्थिती स्वीकारली जात नाही, तेव्हा ‘मी या आश्रमात माझा उद्धार करून घेण्यासाठी आलो आहे’, ही जाणीव माझ्यात अल्प असते.

५. सेवा मनापासून केल्याने ‘सेवेतील आनंद आणि गुरूंचा आशीर्वाद मिळत आहे’, असे जाणवणे 

‘गुरु माझे कल्याणच करणार आहेत’, असा विचार माझ्या मनात असल्यास कोणत्याही वेळी किंवा ठिकाणी सेवा करायची असली, तरी ती स्वीकारून सेवा केली, तर गुरुदेवांची कृपा होते’, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे. आता आश्रम स्तरावरील सेवा ऐन वेळी किंवा कुठल्याही परिस्थितीत आली, तर मी ती सेवा स्वीकारून मनापासून करतो. त्यामुळे ‘मला सेवेतील आनंद आणि गुरूंचा आशीर्वाद मिळत आहे’, असे मला जाणवत आहे. त्यामुळे मला आता एक स्थिरता अनुभवता येते आणि मनाला समाधान मिळते.

६. ‘आश्रम म्हणजे केवळ आश्रम नसून ते ‘विष्णुधाम’ आहे आणि विष्णुधामातील प्रत्येक सेवा करणे’, ही माझी साधना आहे’, हे वरील चिंतनातून आणि अनुभूतींतून माझ्या लक्षात आले. 

‘हे गुरुमाऊली, आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न सतत करून घ्या. ‘मला आध्यात्मिक स्तरावर जे अनुभवायला दिले’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक