Fake Supreme Court Order : सर्वाेच्च न्यायालयाचे बनावट आदेश पत्र वापरून जन्मठेपेच्या कैद्याची सुटका !

  • बेंगळुरू येथील परप्पना अग्रहार कारागृहात घडलेली घटना ८ वर्षांनंतर उघडकीस !

  • तत्कालीन तुरुंगाधिकार्‍याची चूक असल्याचा संशय

बेंगळुरू (कर्नाटक) – सर्वाेच्च न्यायालयाचे बनावट आदेश पत्र सादर करून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याची येथील परप्पना अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून (बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहातून) सुटका झाल्याचे ८ वर्षांनंतर उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे.

१. शंकर ए. नावाच्या आरोपीला वर्ष २००१ मध्ये अपहरण आणि खंडणी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो परप्पना अग्रहार मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

२. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत तुरुंग अधिकार्‍यांना सादर करून १३ नोव्हेंबर २०१८ या दिवशी त्याची सुटका झाली होती. सुटकेच्या वेळी त्याने १० सहस्र रुपये दंडही भरला होता.

३. याविषयी परप्पना अग्रहार ठाण्याच्या पोलिसांनी २० मे या दिवशी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

४. तक्रारीनुसार न्यायालयाचा बनावट आदेश वापरून एका कैद्याची सुटका झाली आहे, अशी माहिती कारागृह आणि सुधार सेवा महासंचालकांना मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या अंतर्गत तपासात आरोप सत्य असल्याचे समोर आले.

५. आरोपीच्या सुटकेला तत्कालीन तुरुंग अधिकार्‍यांच्या कर्तव्यातील त्रुटीही कारणीभूत असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

६. न्यायालयाच्या आदेशाची सत्यता न तपासता आणि आवश्यक प्रक्रियेचे पालन न करता कैद्याची सुटका करण्यात आली आहे, हे अन्वेषणात उघडकीस आले.