फलटण (सातारा) येथील ‘दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’ची अनुमती रहित !


सातारा, २५ मे (वार्ता.) –
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने फलटण येथील ‘दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके’ची अनुमती अधिकृतपणे रहित केली आहे. अधिकोषाची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत जाणे, अपुरे भांडवल, तसेच बँकिंग नियमांचे उल्लंघन ही कारणे देत अधिकोषावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.

१. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे कठोर पाऊल उचलणे भाग पडले आहे. अधिकोषाकडे सध्या व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे भांडवल नाही, तसेच भविष्यात कमाईची कोणतीही शाश्वत चिन्हे उरलेली नाहीत.

२. बँकिंग क्षेत्रातील सुरक्षितता आणि स्थिरता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक महत्त्वाच्या नियम, अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात अधिकोष व्यवस्थापन अपयशी ठरले आहे.

३. अधिकोषाची सद्य:स्थिती पहाता त्यांच्या ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे परत करण्यास ते असमर्थ आहे. त्यामुळे अधिकोषाचे कामकाज पुढे चालू ठेवणे, हे ठेवीदार आणि सार्वजनिक हित यांच्या दृष्टीने पूर्णपणे घातक ठरेल.