डोंबिवलीत अवैधरित्या रहाणारे नायजेरियाचे २४ नागरिक कह्यात !

नायजेरियाच्या २४ नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले.

डोंबिवली – येथील खोणी पलावा भागातील डाऊन टाऊन आणि क्राऊन पलावा या उच्चभ्रू गृहसंकुलांमधून नायजेरियाच्या २४ नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले. यामधील काही नागरिकांवर अमली पदार्थ तस्करी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुले यांचा समावेश आहे. त्यातील ८ जणांकडे भारतीय वास्तव्याची कागदपत्रे आहे, तर उर्वरितांकडे भारतामधील वास्तव्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नाहीत. त्यांतील ९ जणांवर ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करीशी संबंधित गुन्हे नोंद आहेत.

पोलिसांची या परिसरात धरपकड मोहीम चालू असतांना एका नायजेरियाच्या महिलेने पळून जाण्यासाठी घराच्या चौथ्या माळ्यावरील गच्चीत येऊन थेट खाली उडी मारली. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले.

नायजेरियाच्या नागरिकांना ज्या घरमालकांनी त्यांची घरे भाड्याने दिली, त्याविषयी पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही, अशा घरमालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

घुसखोरांचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! कह्यात घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच का केली नाही ? नायजेरियन नागरिक विना परवाना रहात होते, हे वेळीच कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ? या प्रकरणातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई व्हायला हवी !