‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण
प्रा. कुलकर्णीने शिरूरे यांच्या घरातच घेतले होते संशयास्पद वर्ग !
बीड, नाशिक, अहिल्यानगर येथे धागेदोरे !

लातूर/पुणे – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य संशयित प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि आर्.सी.सी. शिकवणीवर्गाचे प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या जबाबाच्या आधारे ‘सीबीआय’ने लातूरचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना कह्यात घेतले होते; मात्र २१ मेच्या रात्री २ दिवस चाललेल्या चौकशीनंतर ‘सीबीआय’ने डॉ. शिरूरे यांना या प्रकरणात ‘साक्षीदार’ केले आहे. ‘सीबीआय’च्या पथकाने डॉ. शिरूरे यांचा बंगला, त्यांचे ‘सिद्धिविनायक रुग्णालय’ आणि शेजारीच रहाणारे त्यांचे मेहुणे डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्या घराची पुन्हा झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यानंतर डॉ. शिरूरे यांना पुण्याच्या सीबीआय कार्यालयात उपस्थित रहाण्याची नोटीस बजावली आहे.
घर आणि रुग्णालयात भरले ‘विशेष वर्ग’
एप्रिलमध्ये प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉ. शिरूरे यांच्यात सातत्याने भ्रमणभाषवरून संवाद झाला होता, तसेच डॉ. शिरूरेंच्या रुग्णालयात कुलकर्णीची ये-जा असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण ‘सीबीआय’च्या हाती लागले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरूरे यांच्या घरात आणि रुग्णालयातच काही निवडक विद्यार्थ्यांसाठी गुप्त वर्ग घेतले होते. या वर्गात प्रा. मोटेगावकरचा मुलगा आणि डॉ. शिरूरेंच्या मेव्हण्याची मुलगी (ज्याने यंदा ‘नीट’ परीक्षा दिली) उपस्थित होते. याच कारणावरून ‘सीबीआय’ला शिरूरे यांनी कोट्यवधी रुपयांना प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय होता.
अंबाजोगाईत ‘सीबीआय’ची धाड !
नीट प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे आता बीड जिल्ह्यापर्यंत पोचले आहेत. ‘सीबीआय’च्या ७ अधिकार्यांच्या पथकाने २१ मे या दिवशी अंबाजोगाईतील गुरुवार पेठ भागात टपाल वाहकाच्या साहाय्याने एका शिक्षिकेचे घर शोधून तिथे २ घंटे झडती घेतली. या शिक्षिकेची दोन्ही मुले प्रा. मोटेगावकरच्या शिकवणीवर्गाचे विद्यार्थी असून त्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळाले असल्याचा संशय आहे. त्यांचे भ्रमणभाष आणि चॅट्स ‘सीबीआय’ने जप्त केले असून या प्रकरणाची लिंक आता धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांपर्यंत पोचली आहे.
…असा झाला देशातील पहिल्या प्रश्नपत्रिका फुटीचा पर्दाफाश !श्री. शशिकांत सुथार (‘नीट’चे रसायनशास्त्र शिक्षक, सिकर, राजस्थान) यांनी एका दैनिकाच्या प्रतिनिधीला सांगितले की, ३ मे या दिवशी परीक्षा झाल्यानंतर माझ्या घरमालकाने मला ‘व्हॉट्सॲप’वर एक प्रसारित पी.डी.एफ्. दाखवली. ती केवळ ‘गेस पेपर’ म्हणून फिरत होती; मात्र मी जेव्हा पडताळले, तेव्हा त्यातील रसायनशास्त्राचे ४५ आणि जीवशास्त्राचे बहुतांश प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते. १२ वर्षांच्या अनुभवावरून मला निश्चिती पटली की, हा अंदाज नसून प्रश्नपत्रिका फुटली आहे. आम्ही ३ मेच्या रात्रीच स्थानिक पोलिसांत गेलो; पण ठोस पुराव्याअभावी गुन्हा नोंदवला गेला नाही. त्यानंतर मी पुरावे गोळा करून ७ मे या दिवशी थेट शिक्षण मंत्रालय, एन्.टी.ए. आणि ‘सीबीआय’ला ई-मेल पाठवला. त्यानंतर ‘सीबीआय’ने त्वरित आमचे जबाब घेऊन या प्रकरणाची त्वरित चौकशी चालू केली. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी ही लढाई लढलो. |
आर्.सी.सी. शिकवणीवर्गाच्या ‘प्रीमियम बॅच’चे व्यावसायिक गणित
लातूरच्या आर्.सी.सी. शिकवणीवर्गात तब्बल १५ सहस्र विद्यार्थी शिक्षण घेतात; मात्र प्रारंभीच ५० विद्यार्थ्यांची एक विशेष ‘प्रीमियम बॅच’ सिद्ध केली जाते. सामान्य विद्यार्थ्यांहून दुप्पट म्हणजेच दीड लाख रुपये शुल्क आकारून या मुलांना अतीमहनीय सोयीसुविधा दिल्या जातात. या ‘प्रीमियम बॅच’मधील ६० टक्के मुले प्रतिवर्षी ‘एम्.बी.बी.एस्.’साठी पात्र ठरतात, तर सर्वसामान्य बॅचमधील केवळ १५ टक्के मुलेच उत्तीर्ण होतात. शिकवणीवर्ग याच ‘प्रीमियम बॅच’च्या निकालांच्या जोरावर मोठे विज्ञापन करून पालकांची दिशाभूल करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
भ्रमणभाषमधील चॅट्स आणि हस्ताक्षरांचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे !
पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या ‘पेपर सेटर’ (प्रश्नपत्रिका सिद्ध करणार्या) प्रा. मनीषा मांढरे आणि ‘ब्युटीशियन’ मनीषा वाघमारे यांच्या भ्रमणभाषमधून पेपर खरेदी करणार्यांची मोठी सूची समोर आली आहे. या दोघींच्या हस्ताक्षरांचे नमुने न्याय वैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून नाशिकमधून अटक केलेला संशयित शुभम् खैरनार आणि अहिल्यानगरचा डॉ. धनंजय लोखंडे यांच्याशी असलेल्या संपर्काची पुण्यात चौकशी चालू आहे.
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
आषाढी वारीमध्ये वारकर्यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !