
नुकत्याच महाराष्ट्रात लागलेल्या १० वीच्या निकालात तब्बल ९४ सहस्र विद्यार्थी चक्क ‘मराठी’ विषयात अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. अभिजात (समृद्ध) दर्जा मिळालेली मराठी भाषा ही शाळांमध्ये सक्तीची केली असतांनाही राजभाषेची घसरण शिक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारी आहे. तज्ञांनी शासकीय अनास्था आणि समाजाची पालटती मानसिकता या २ प्रमुख कारणांकडे लक्ष वेधले आहे. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘‘२ वर्षांपूर्वी ही संख्या ४० सहस्र होती, ती आता ९४ सहस्रांवर गेली. मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, साधनसामग्रीचा अभाव आणि एकूणच गुणवत्तेकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे ही वेळ आली आहे.’’
‘परख’ या केंद्र सरकारच्या शैक्षणिक मूल्यमापन अहवालात महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावर घसरला आहे, हे भूषणावह नाही. केवळ ‘इंग्रजी’ची कास धरतांना मराठीकडे झालेले दुर्लक्ष विद्यार्थ्यांची हानी करत आहे. आपल्या चुकीच्या धोरणाचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. मातृभाषेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, हा कुणाचा दोष म्हणावा लागेल ? मुळात मराठी भाषेकडे अनास्थेने पाहिले जाते, हा त्याचा परिणाम आहे, तसेच ‘मराठी ही ज्ञानभाषा नाही’, ‘मराठी शिकून स्पर्धेत टिकू शकत नाही’ किंवा ‘नोकर्या-रोजगार मिळत नाहीत’, अशा विचारांची एक घट्ट साखळी निर्माण झालेली आहे. ही आपल्या चुकीच्या भाषिक धोरणांची आणि मराठी शाळा बंद होत चालल्याची फलश्रुती आहे.

शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आणि महाराष्ट्रातील ‘वारे गुरुजी’ किंवा ‘रणजितसिंह डिसले’ यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. ‘भाषेचे भले करण्याचे दायित्व केवळ शासनाचे आहे’, अशी समाजाची मानसिकता चुकीची आहे. जरी पालकांनी पाल्याला इंग्रजी माध्यमात शिकण्यास घातले, तरी घरात मराठी बोलणे, मराठी वृत्तपत्रे आणि शालेय पुस्तकांसह अवांतर पुस्तके वाचण्याची गोडी लावणे आवश्यक आहे. घरातील मराठी वातावरणाच्या अभावामुळे विद्यार्थी मातृभाषेतच मागे पडत आहेत.
मराठी विद्यार्थ्यांचा पहिला विषय मराठी आहे. त्यात मुलांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण बर्यापैकी आहे. दुसरा विषय असलेल्या ठिकाणीही असेच घडत आहे. विद्यार्थ्यांची ही स्थिती आणि अनुत्तीर्ण होणार्यांची संख्या चिंताजनक आहे. यासाठी शालेय स्तरावर, म्हणजे शालेय शिक्षणमंत्र्यांच्या पातळीवर आणि मराठी भाषा अभ्यासकांचा अभ्यासगट स्थापन करून शासनाने हे का होत आहे, याचा तातडीने अभ्यास करावा आणि उपाययोजना काढून त्या लागू करणे आवश्यक आहे !
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, विहिघर, पनवेल.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !