Manoj Shirure NEET Exam : लातूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरूरे यास अटक !

  • ‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण

  • लातूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरूरे यास अटक !

  • स्वतःच्या मुलासाठी प्रा. शिवराज मोटेगावकर याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप

  • प्रथमच पालकाला अटक

लातूर – ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात थेट विद्यार्थ्यांच्या पालकाचा सहभाग उघडकीस आला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरूरे यास अटक केली. स्वतःच्या मुलाला परीक्षेत अनधिकृतरित्या लाभ मिळवून देण्यासाठी त्याने मुख्य आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकर याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एखाद्या पालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

डॉ. मनोज शिरूरे हा लातूरमधील जुना औसा रोड भागातील ‘सिद्धिविनायक बाल रुग्णालया’चा संचालक आहे. ‘सीबीआय’चे पथक १७ मेपासून लातूरमध्ये तळ ठोकून असून संशयितांची कसून चौकशी करत आहे. ‘सीबीआय’च्या अधिकार्‍यांनी डॉ. शिरूरे याच्या रुग्णालयावर धाड घालत सलग साडेचार घंटे अन्वेषण केले. या कारवाईत काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे, संशयास्पद भ्रमणभाषसंच आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक अन्वेषणाअंती डॉ. शिरूरे याचे मुख्य आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी या दोघा आरोपींशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.

या प्रश्नपत्रिकांची कोणतीही ठरलेली किंमत नव्हती. पालकांची आर्थिक स्थिती पाहून ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत सौदा केला जात होता. प्रारंभी केवळ अगाऊ रक्कम (टोकन मनी) घेतली जायची. उत्तरपत्रिका आल्यानंतर प्रश्न जुळले, तरच उर्वरित रक्कम द्यायची, असा करार होता. उर्वरित रकमेच्या हमीसाठी पालकांकडून कोरे धनादेश आणि विद्यार्थ्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे तारण ठेवली जात होती.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि लातूरमधील आर्.सी.सी. शिकवणीवर्गाचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर या काळ्या पैशांच्या जोरावर लातूरच्या खोपेगाव शिवारात ८ एकर भूमीवर मोठी शाळा आणि महाविद्यालय उभारण्याच्या सिद्धतेत होता. तिथे बहुमजली इमारतीचे कामही वेगाने चालू होते. सीबीआय आता त्याच्या निधीचे स्रोत आणि भूमीखरेदी व्यवहारांचीही चौकशी करत आहे. या कारवाईचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेने प्रा. मोटेगावकरच्या ‘आर्.सी.सी.च्या वर्गांना टाळे ठोकले आहे.

अंबाजोगाई येथील २ विद्यार्थ्यांची चौकशी चालू !

देहलीतील ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी मांगीलाल खटीक, विकास बिवाल, दिनेश बिवाल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांना २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर शुभम खैरनारची सीबीआय कोठडी ५ दिवसांनी वाढवली आहे. दुसरीकडे अंबाजोगाई येथील २ विद्यार्थ्यांची चौकशी चालू असून त्यांचे भ्रमणभाष जप्त केले आहेत, तसेच मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे यांना पुण्यात आणून समोरासमोर चौकशी केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झालेल्या आणखी काही पालकांनाही पुणे सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘नीट’ परीक्षेच्या सिद्धतेचा आढावा !

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘नीट’च्या आगामी परीक्षेच्या सिद्धतेचा आढावा घेतला. सामाजिक माध्यम आणि टेलिग्राम वाहिनीवर पेपरफुटीच्या संदर्भात अफवा आणि दिशाभूल करणारे दावे पसरवणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

संपादकीय भूमिका

असे पालक प्रश्नपत्रिका विकत घेऊन स्वतःच्या पाल्यासह सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य तर बिघडवत आहेत. अशा पालकांवरच कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.