हडफडे येेथे तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता

प्रतिकात्मक चित्र

पणजी, २० मे (वार्ता.) – फिर्यादी पक्ष आरोप निःसंदिग्धपणे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्याने उच्च न्यायालयाने वर्ष २०२३ मधील हडफडे येथील बलात्कार प्रकरणात साळगाव, बार्देश येथील २५ वर्षांच्या रहिवाशाची १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा रहित करून निर्दोष मुक्तता केली आहे. हडफडे येथील एका हॉलिडे होममध्ये मैत्रिणीसमवेत गेलेल्या एका १८ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. न्यायालयाने निकाल देतांना फिर्यादीच्या उत्तरांमधील विसंगती, प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट करण्यास झालेला ४८ घंट्यांचा विलंब, कथित वेळेनुसार न जुळणारे वैद्यकीय पुरावे आणि आरोपी हॉटेलच्या खोलीत असल्याचे निर्णायक सीसीटीव्ही पुरावे नसणे, या गोष्टींचा उल्लेख केला. फिर्यादीने उलटचौकशीच्या वेळी हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीच्या पत्नीकडे ५ लाख रुपयांची मागणी केल्याची स्वीकृती दिली होती, असे न्यायालयाने नमूद केले आहे.