तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायोनी घोष यांचा शिरच्छेद करणार्‍याला १ कोटी रुपयांचे  बक्षीस देणार

  • उत्तरप्रदेशातील सिकंदराबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असणारे भाजपचे नेते डॉ. प्रदीप दीक्षित यांची घोषणा

  • सायोनी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान करणारी पोस्ट सामाजिक माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील सिकंदराबाद नगरपालिकेचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते डॉ. प्रदीप दीक्षित यांनी बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायोनी घोष यांचा शिरच्छेद करणार्‍याला १ कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. त्यांची ही घोषणा सायोनी घोष यांच्या शिवलिंगाचा अवमान करणार्‍या एका जुन्या पोस्टशी (सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केलेली माहिती किंवा व्हिहिओ) संबंधित आहे.

१. प्रदीप दीक्षित यांचा सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत, ‘मी प्रतिदिन १ घंटा भगवान शंकराची पूजा करतो. तृणमूलच्या खासदार सायोनी घोष यांनी केलेल्या कृत्यामुळे मला खोलवर दुखापत झाली आहे. जो कुणी सायोनी घोष यांचे कापलेले शिर आणेल, त्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.’ सिकंदराबादमध्ये एका निदर्शनाच्या वेळी दीक्षित यांनी हे विधान केले. या वेळी सायोनी घोष यांच्या पोस्टला आयोजकांनी ‘देवतांचा अपमान’ म्हटले होते.

२. दीक्षित यांच्या या विधानावर बुलंदशहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष जियाउर रहमान यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली. रहमान म्हणाले की, ‘पक्षामध्ये असे लोक असतांना महिला कशा सुरक्षित राहू शकतात ? ते एका महिलेच्या हत्येसाठी बक्षीस देत आहेत. हे लाजीरवाणे आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. आम्ही गुन्हा नोंदवण्याची मागणी करतो.’

३. भाजपचे जिल्हाध्यक्ष विकास चौहान यांनी सांगितले की, हे दीक्षित यांचे वैयक्तिक मत असून त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

सायोनी घोष यांनी वर्ष २०१५ मध्ये त्यांच्या सामाजिक माध्यमावरील खात्यावरून  एक पोस्ट शेअर केली होती, जी वर्ष २०२१ आणि नंतर या वर्षी २०२६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांच्या नजरेत आली होती. यापूर्वीही या पोस्टवरून घोष यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. घोष यांनी स्पष्ट केले होते की, वर्ष २०१५ मध्ये त्यांचे खाते ‘हॅक’ झाले होते आणि हॅकरनेच ती पोस्ट केली होती. खात्यावर पुन्हा नियंत्रण मिळाल्यानंतर लगेचच ती पोस्ट हटवली होती.