Bhopal Muslims Protest : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे मध्यरात्री मुसलमानांकडून कथित धार्मिक भावना दुखावल्यावरून हिंसक आंदोलन

  • ४ पोलीस घायाळ

  • जमावबंदी आदेश लागू

  • मुसलमान तरुणासमवेत रहाणार्‍या हिंदु तरुणीची हिंदुत्वनिष्ठांकडून सुटका करतांना इस्लामविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे १२ मेच्या रात्री कथित धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या आणि आक्षेपार्ह शब्दांच्या वापराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून शेकडो मुसलमानांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी मुसलमानांकडून पोलिसांवर दगडफेकही झाली. यामध्ये पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि ४ पोलीस घायाळ झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला तिथून हटवले. यानंतर जुन्या शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू केली आहे, तर काही मुसलमान संघटनांनी आरोपींना अटक न झाल्यास ‘भोपाळ बंद’ची चेतावणी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

भोपाळमध्ये १० मे या दिवशी हिंदु संघटनेशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी एका हॉटेलमध्ये एकत्र थांबलेला मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांना पकडले होते. असा आरोप आहे की, मुसलमान तरुणाला मारहाण करण्यात आली, त्याच्या तोंडाला शाई आणि शेण फासले गेले, तसेच त्याला अर्धनग्न अवस्थेत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यापूर्वी आक्षेपार्ह शब्दांचाही वापर करण्यात आला होता. संबंधित हिंदु तरुणीने सांगितले होते की, ती त्या तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहात आहे.

आंदोलक मुसलमानाचा आरोप होता की, मारहाणीच्या वेळी धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह भाषा वापरली गेली. यानंतर एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात पोचले आणि त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक सिद्ध करण्यात आले आहे. (हिंदूंच्या अटकेसाठी तात्काळ कृती करण्यास सिद्ध होणारे पोलीस धर्मांधांच्या विरोधात असे तत्पर कधी होतात का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या तरुणींना मुसलमानांकडून फूस लावून, आमीष दाखवून आणि फसवणूक करून पळवून नेल्यावर हिंदूंकडून कधी असे आंदोलन केले जात का ? मात्र हिंदूंनी तरुणीला सोडवल्यावर कांगावखोर मुसलमान अशा प्रकारे जनतेला वेठीस धरतात !
  • मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !