निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक ! – अविनाश धर्माधिकारी, संस्थापक, चाणक्य मंडल

वैद्य परीक्षित शेवडे आणि वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये लिखित ३ पुस्तकांचे पुणे येथे प्रकाशन

पुणे – आधुनिक वैद्यकशास्त्रात आजार बरे करण्याचे उपचार असले, तरी आजारच होऊ नये आणि निरोगी कसे रहावे ? हे आयुर्वेदाने सांगितले आहे. निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक आहे, असे मत ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ‘नाविन्य प्रकाशना’च्या वतीने वैद्य परीक्षित शेवडे आणि वैद्या (सौ.) स्वराली शेंड्येलिखित ‘स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद’, ‘निरोगी रहा’ अन् ‘बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद’ या पुस्तकांचे प्रकाशन धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. प्रकाशक नितीन खैरे या वेळी उपस्थित होते.

धर्माधिकारी म्हणाले की, २१व्या शतकातील माणसाच्या अनैसर्गिक आणि मुदतपूर्व मृत्यूला ‘ताण’ कारण ठरू शकतो, असे भाकीत पूर्वजांनी केले होते. हे खरे ठरत असेल, तर त्याच्या मुळाशी भोगवादी संस्कृती आहे. ती बळावत असून त्यातून ताण निर्माण होत आहे. प्राचीन शास्त्रातील मन हे सहावे इंद्रिय असल्याचे विज्ञानानेही मान्य केले आहे. तिन्ही पुस्तकांतून आपल्याला प्रत्यक्षात काय करता येऊ शकते ? आणि आयुर्वेदातील ज्ञान आपल्याला आचरणात कसे आणता येऊ शकते ? याविषयी वैद्य शेवडे यांनी मनोगतात सांगितले.