MP ISI Links : ‘आय.एस्.आय.’शी संबंध असलेल्या मध्यप्रदेशातील ३ तरुणांना अटक  

देहलीतील मंदिर, ढाबा आणि सैन्यतळ उडवण्याचा होता डाव

अटक करण्यात आलेले आरोपी

भोपाळ (मध्यप्रदेश) – पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आय.एस्.आय.शी संबंध असल्याच्या प्रकरणी मध्यप्रदेशातील ३ तरुणांना देहली पोलिसांनी अटक केली. अनमोल राय (वय २४ वर्षे), राजवीर (वय २१ वर्षे) आणि विवेक बंजारा (वय १९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. (अटक करण्यात आलेल्यांची नावे हिंदु आहेत. यावरून त्यांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याकडून जिहादी कारवाया करून घेण्याचा कट होता का, याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक) हे तिघे देहलीतील ऐतिहासिक मंदिरे, देहली-सोनीपत महामार्गावरील एक ढाबा आणि हरियाणातील सैन्यतळ उडवणार होते.

देहलीच्या विशेष अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक कुशवाह यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी गरीब कुटुंबातील आहेत. तिघांच्याही भ्रमणभाषवरील ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्सवरून संशयास्पद क्रमांकांवर बोलणे झाल्याचे, तसेच सामाजिक माध्यमांद्वारे विशिष्ट ठिकाणांची छायाचित्रे पाकिस्तानात पाठवल्याचे आढळून आले आहे. यासह त्यांच्याकडे संशयास्पद ई-मेलही मिळाले आहेत. आतंकवादी कटात सहभागी करून घेण्यासाठी आरोपींना काय मिळाले होते ?, याचा पोलीस शोध घेत आहेत.

‘गँग बस्ट ऑपरेशन २.०’ अंतर्गत खुलासा !

देहलीच्या विशेष अन्वेषण पथकाने ‘गँग बस्ट ऑपरेशन २.०’ (गुन्हगारांच्या टोळ्यांचा निःपात करण्याची मोहीम) अंतर्गत विविध राज्यांमधून शाहजाद भट्टी गटाशी संबंधित ९ संशयितांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून कळले की, आरोपींपैकी एकाने देहलीतील एका ऐतिहासिक मंदिराची ‘रेकी’ (आक्रमणापूर्वी केलेली पहाणी) केली होती. या परिसराची छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून पाकिस्तानात पाठवली होती. आता अटक केलेल्या आरोपींना मंदिरात तैनात असलेले पोलीस आणि निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण करून दहशत पसरवायची होती.

संपादकीय भूमिका

अशा अनेकांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यांना देशद्रोही ठरवून तात्काळ फाशीची शिक्षा दिली गेली असती, तर असे कृत्य करण्याचे कुणाचे धाडस झाले नसते !