
क्रीडा क्षेत्रात महिला प्रामुख्याने पाश्चिमात्य कपडे परिधान करतात. बॅडमिंटन किंवा टेनिस खेळतांना भारतीय महिलांनी तोकडे कपडे घालणे, ही ५० वर्षांपूर्वी ही मोठी कुतूहलाची गोष्ट असायची; मात्र आता ते सर्रास झाले आहे. आता तर दहीहंडी खेळणारी युवतींची पथकेही तोकडे कपडे घालतात. त्यांनी पूर्ण कपडे घातले, तर जणू त्यांना दहीहंडी खेळताच येणार नाही ! कित्येक मुली घरात आणि घराबाहेरही तोकडे कपडे सर्रास घालतात; मात्र ब्रिटनमध्ये रहाणार्या ४६ वर्षीय भारतीय महिला मधुस्मिता जेना दास यांनी या तोकड्या कपड्यांच्या विचारांना छेद दिला आहे. मधुस्मिता यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली ‘साडी’ नेसून ४२.२ कि.मी.ची मँचेस्टर मॅरेथॉन अवघे ३ घंटे ४५ मिनिटांत पूर्ण केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. परदेशात राहूनही हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगत त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. साडी नेसून कोणतीही कठीण गोष्ट साध्य करता येते, हे त्यांनी जागतिक स्तरावर दाखवून दिले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली स्वसंस्कृतीचा अभिमान बाळगल्यास ईश्वरी कृपेने अशक्य गोेष्टीही शक्य होतात, हेच या घटनेतून शिकायला मिळते.

मॅरेथॉनसारख्या अत्यंत कठीण स्पर्धेत धावण्यासाठी जिथे केवळ आधुनिक खेळाडूंचे कपडेच सोयीचे मानले जातात, तिथे मधुस्मिता यांनी ओडिशाची प्रसिद्ध ‘संबलपुरी साडी’ नेसून धावण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी या मॅरेथॉनमधील १२ मिनिटांपेक्षा अधिक वेळचा विक्रम मोडीत काढला. ही कामगिरी केवळ शारीरिक क्षमतेची नसून आपल्या संस्कृतीप्रती असलेल्या अढळ श्रद्धेचा हा विजय आहे. मॅरेथॉनमध्ये साडी सांभाळून धावणे, हे शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असले, तरी मधुस्मिता यांनी ते सहजतेने साध्य केले. यामागे त्यांचे प्रबळ आत्मबळ आणि संस्कृतीप्रती असलेला अभिमान कारणीभूत आहे. इथे झाशीच्या राणीसह पूर्वीच्या अनेक विरांगनांनी नऊवारी नेसून युद्धे केली, याची आठवण झाल्याविना रहात नाही.
अध्यात्मशास्त्रानुसार साडीमध्ये सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. आजकालच्या पुरोगामी आणि आधुनिक विचारसरणीच्या महिलांना साडी नेसणे अडथळ्याचे अन् जुन्या विचारसरणीचे वाटते. स्वतःला आधुनिक समजणार्यांनी यातून बोध घ्यावा ! यावर असा अपसमज पसरवला जातो की, हिंदु संस्कृतीचे पालन करणारे लोक आधुनिक युगात मागे पडतात. मधुस्मिता दास यांनी विश्वविक्रम प्रस्थापित करून हे सिद्ध केले की, हिंदु संस्कृतीचे पालन करूनही आधुनिक जगात यशस्वी होता येते !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !