देवतांबद्दल अवमानास्पद वक्तव्य : कारवाईविषयी पुरोहित ब्राह्मण संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतांना पुरोहित ब्राह्मण संघाचे सदस्य

मडगाव, ५ मे (वार्ता.) – गेले काही दिवस सामाजिक माध्यमांत हिंदु धर्मातील देवतांबद्दल विशेषतः भगवान परशुराम आणि माता रेणुका यांच्याबद्दल अत्यंत अवमानास्पद वक्तव्य काही ख्रिस्त्यांकडून करण्यात आले. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गोव्यातील पुरोहित ब्राह्मण संघाने दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन मडगावच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी स्वीकारले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी हिंदु धर्मातील देवतांविषयी विशेषतः भगवान परशुराम आणि माता रेणुका यांच्याविषयी अत्यंत अवमानास्पद वक्तव्य काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे आमच्या धार्मिक भावना तीव्र दुखावल्या असून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत देशात प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. असे असूनही अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती उपाययोजनाही करावी. अशा घटना घडत राहिल्यास जनक्षोभ होऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तरी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून त्वरित कार्यवाही करावी.