पोलिसांनी २ हिंदु साधूंना जमावाच्या हाती दिले, तसे आरोपीला पोलीस जमावाच्या स्वाधीन करणार का ?

नसरापूर (जिल्हा पुणे) येथील ४ वर्षांच्या मुलीवर ६५ वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणावर परखड भाष्य !

मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘नसरापूर प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर मृत्युदंड व्हावा, अशी मागणी करू.’’ न्यायव्यवस्थेनेच त्या भीमराव कांबळेला (आरोपीला) २ वेळेला अटक होऊनही जामिनावर सोडले होते ना ? ती असली भ्रष्ट न्यायव्यवस्था त्याला मृत्यूदंड देणार ? किती वर्षांनंतर केसचा निकाल लागणार ? १० वर्षे ? १५ वर्षे ? २५ वर्षे ?

बरे, समजा ‘फास्ट ट्रॅक प्रोसिडिंग’ (जलद गती न्यायालयात सुनावणी) करून खालच्या न्यायालयाने दिली एका वर्षात फाशीची शिक्षा, तरी त्याची कार्यवाही होणारच नाही. पुढे उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालय करत करत १० वर्षे निघून जातील. त्यानंतरही मानवाधिकार आयोगवाले दयेची याचिका प्रविष्ट करतील, मग प्रकरण राष्ट्रपतींकडे जाईल. या सगळ्यात न्यूनतम २० वर्षे सहज निघून जातील आणि तितकी वर्षे हा नराधम करदात्याच्या व्ययाने तुरुंगात मजेत राहील, त्याला जामीन मिळेपर्यंत ! आपण सर्व लोक काय, महिनाभरात विसरून जाऊ हे प्रकरण. त्या निष्पाप लेकीचे कुटुंबीय मात्र आयुष्यभर या आगीत होरपळत रहातील.

सौ. शेफाली वैद्य

फाशी देण्याविषयीची उदासीनता !

गेल्या १५ वर्षांत (वर्ष २०११ ते वर्ष २०२६) भारतात केवळ ३ वेगवेगळ्या प्रसंगी एकूण ६ जणांना फाशी देण्यात आली. त्यातील अजमल कसाब, महंमद अफझल आणि याकूब मेमन हे इस्लामी आतंकवादी होते, तर देहलीच्या ‘निर्भया’ प्रकरणामधील तिघांना वर्ष २०२० मध्ये एकत्र फाशी देण्यात आली होती. निर्भया प्रकरण घडले डिसेंबर २०१२ मध्ये आणि फाशी कार्यवाहीत आली वर्ष २०२० मध्ये तब्बल ८ वर्षांनंतर, तेही जलद गती न्यायालय वगैरे होऊन. आज संपूर्ण देशात अनुमाने ५६४ बंदीवान फाशीच्या प्रतीक्षेत आहेत. वर्ष २०२० पासून कुणालाही फाशी झालेली नाही.

सर्वाेच्च न्यायालयाने एका अत्याचारी आरोपीला दिलेली फाशीची शिक्षा रहित करणे

या भीमराव कांबळेचा थोरला भाऊ शोभावा, असा नागपूरचा वसंत संपत दुपारे गेली १७ वर्षे सरकारी पाहुणचार घेत आहे. वर्ष २००८ मध्ये त्याने नागपूरच्या वाडी परिसरातून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या केली आणि ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप केला. २०१० मध्ये नागपूरच्या सत्र न्यायाधीशांनी दुपारे याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची दोषसिद्धी आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली; पण गेल्या वर्षी म्हणजे वर्ष २०२५ मध्ये याच सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचाच आधीचा आदेश रहित केला आणि प्रकरण केवळ शिक्षेच्या फेरसुनावणीसाठी परत पाठवले; कारण न्यायमूर्तीसाहेबांना म्हणे फाशीची शिक्षा देण्यापूर्वी आरोपीचे मनोवैज्ञानिक मूल्यमापन आणि सहानुभूतीदर्शक परिस्थितीचा विचार करायचा आहे !

१७ वर्षे उलटून गेली, फाशीची शिक्षा होऊनही वसंत दुपारे छान जिवंत आहे, जेलमध्ये करदात्यांच्या पैशांवर एैष करत आहे. या भिमाजी कांबळेचेही असेच होईल. ‘तारीख पे तारीख’ पडत जाईल; पण कुणाला ढिम्म काही फरक पडणार नाही.

लोक सर्व विसरले की, आरोपी जामिनावर सुटून पुन्हा एखाद्या…

यापेक्षा महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, कांबळेला जमावाच्या हवाली करा. तशीही महाराष्ट्र पोलिसांना सवय आहेच, लोकांना जमावाच्या हवाली करायची. पालघर हत्याकांडात त्या बिचार्‍या निष्पाप हिंदु साधूंना अगदी हात धरून पोलिसांनी हिंस्र जमावाच्या हाती सोपवले होते; पण या अत्याचारी माणसाविषयी तसे होणार नाही. त्याला मात्र जिवंत ठेवले जाईल करदात्याच्या खर्चाने आणि २ वर्षांनी लोक सगळे विसरले की, तो जामिनावर सुटून दुसर्‍या एखाद्या निरागस पोरीचा जीव घेणार !

म्हणे, ‘फास्ट ट्रॅक जस्टीस (जलद गती न्याय)’ !

– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध लेखिका आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्यात्या, पुणे. (२.५.२०२६)