‘भगवद्गीते’ची महानता !

१. प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले : जर आपण पारदर्शक व्यक्तीमत्त्व, हृदयाची निर्मळता आणि बुद्धीची गहनता हरवून बसलो असू, तर गीता आमच्यासाठी गूढ अन् न समजणारा ग्रंथ आहे. विचारांनी विद्वान् आणि आचरणाने सज्जन अशा व्यक्तीलाच गीतेचे वाचन करण्याचा खरा अधिकार असतो. हिमालयाएवढी बुद्धीची उत्तुंगता आणि सागराएवढी भावाच्या खोली ज्याने एकाच वेळी जीवनात साध्य केली असेल, तीच व्यक्ती गीतेसारख्या उत्कृष्ट ग्रंथावर वक्तव्य करू शकते.

२. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : ‘श्रीमद्भगवद्गीता’ आपल्या धर्मग्रंथामध्ये एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मळ हिरा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानासहित आत्मविद्येचे गूढ आणि पवित्र तत्त्वांच्या आधारावर मनुष्याच्या पुरुषार्थाची, म्हणजे आध्यात्मिक पूर्णावस्थेचा परिचय करून देणारा ग्रंथ आहे. गीता हा भक्ती आणि ज्ञान यांचा मेळ घालून या दोन्हींचे शास्त्रोक्त व्यवहारासह संयोग करवून देणारा ग्रंथ आहे. गीतेतील ज्ञानाद्वारे जगातील दुःखी मनुष्याला शांती प्रदान करून त्याला निष्काम कर्तव्याचे आचरण करायला लावणारा, गीतेसमान बाळ-बोध ग्रंथ संस्कृत व्यतिरिक्त संपूर्ण जगातील कोणत्याही साहित्यात सापडूच शकत नाही.’

३. स्वामी शिवानंद : ‘श्रीमद्भगद्गीता’ एक सार्वभौमिक ग्रंथ आहे. तो ग्रंथ मानवासाठी अनादि पथदर्शक आहे. गीता मानवाला असत्यापासून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जाते.

४. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : गीता मानवजातीसाठी शाश्वत प्रेरणा स्रोत आहे. मी निरंतर विशेषतः कठीण परिस्थितीमध्ये गीतेचे अध्ययन केल्यानंतर मला संतुलित लाभ प्राप्त होतो आणि गीतेमुळे मला माझ्या प्रत्येक समस्येवर योग्य उपाययोजना मिळते.

५. इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकर्ण : गीता केवळ व्यक्ती किंवा राष्ट्र या विषयाचे नाही, तर संपूर्ण जगातील संकटनिवारण करण्यासाठी अपरिहार्य असलेला ग्रंथ आहे.

(साभार : मासिक ‘कल्याण’, डिसेंबर २०२२)