उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर वनविहारातील आग नियंत्रणात !

आग लागलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी करतांना डावीकडे  उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर आणि अन्य अधिकारी-कर्मचारी

सोलापूर – शहरातील सिद्धेश्वर वनविहार परिसरात नुकतीच शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत सुमारे ४ ते ५ एकर क्षेत्रातील गवत, सुकलेला माळ आणि झुडपे जळून खाक झाली; मात्र उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली.

सिद्धेश्वर वन विहार सुमारे ५०० ते ६०० एकर क्षेत्रात पसरलेले असून येथे विविध वृक्ष, वनस्पती, तसेच वन्य जीव यांचे वास्तव्य आहे. प्राथमिक माहितीनुसार वन विहाराच्या परिसरातून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. वार्‍यामुळे तारांचे घर्षण होऊन या तारा तुटल्याने ठिणग्या उडाल्याने ही आग लागल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. आग लागल्याचे समजताच सर्व कार्यक्रम सोडून तातडीने उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी सिद्धेश्वर वनविहार घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अग्नीशमनदल, वन विभाग तसेच संबंधित यंत्रणांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.