छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मांध महिला अवैध गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघडकीस !

  • भ्रूण खिडकीतून नाल्यात फेकून देत असल्याचेही उघड !

  • भटकी कुत्री लचके तोडून खात होती भ्रूण !

छत्रपती संभाजीनगर – येथील रशीदपुरा भागात एका धर्मांध महिलेकडून गेल्या ५ वर्षांपासून अत्यंत अघोरी आणि क्रूर पद्धतीने अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. शाहेदा परवीन नावाची ही १० वी उत्तीर्ण महिला केवळ १५ सहस्र रुपयांसाठी हे करत होती. धक्कादायक म्हणजे गर्भपातानंतर ती भ्रूण थेट खिडकीतून नाल्यात फेकत असे, जिथे भटकी कुत्री त्यांचे लचके तोडून त्याची विल्हेवाट लावत असत.

या प्रकरणी पोलिसांनी शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद (वय ५१ वर्षे), सय्यद इर्शाद अहमद सय्यद गनी (वय ६१ वर्षे), नसरीन नजीर शेख (वय ४७ वर्षे) आणि मीनाक्षी मंगेश थोरात (वय ३५ वर्षे) यांना अटक केली आहे. यांतील मंगेश थोरात पसार आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पापकर्माच्या पैशांवर मुलाचे लंडनमध्ये शिक्षण !

आरोपी शाहेदा परवीन पूर्वी एका प्रसूतीगृहात दाई म्हणून काम करत होती. तेथेच आधुनिक वैद्यांचे निरीक्षण करून तिने हे अनैतिक तंत्र आत्मसात केले. पोलिसांना संशय येऊ नये; म्हणून गेल्या ५ वर्षांपासून ती शहरात घरे पालटून हा प्रकार करत होती. सध्या ती एका निवृत्त न्यायाधिशांच्या बंगल्यात भाड्याने रहात होती. याच अवैध व्यवसायातून मिळवलेल्या काळ्या पैशांच्या जिवावर तिचा मुलगा लंडनमध्ये अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत आहे.

सजग नागरिकाच्या सतर्कतेमुळे कारवाई !

एका जागरूक महिलेने थेट पोलीस आयुक्तांना भ्रमणभाष करून या अवैध प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी २७ एप्रिलच्या मध्यरात्री रशीदपुर्‍यातील ‘खमर व्हिला’वर धाड घालून वरील आरोपींना अटक केली.

या टोळीचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पसरले होते. मंगेश थोरात आणि मीनाक्षी थोरात हे दांपत्य कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतांना ‘पॅथॉलॉजी लॅब’ चालवत होते. हे बनावट आधुनिक वैद्य ‘पोर्टेबल सोनोग्राफी’ (सोनोग्राफी हे एक आधुनिक निदान साधन आहे, जे शरीरातील अवयवांच्या दृश्य प्रतिमा विकसित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड ध्वनी लहरी वापरते) यंत्र घेऊन थेट रुग्णांच्या घरी जात असत. गर्भ ‘स्त्री’ असल्याचे सांगत मीनाक्षी त्या गर्भवतीला धर्मांध शाहेदाकडे रशीदपुर्‍यात घेऊन यायची. धर्मांध शाहेदा गर्भपातासाठी १५ सहस्र रुपये घ्यायची.

संपादकीय भूमिका

भारतात अशा प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या करून मानवतेला काळिमा फासणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !