मिरज रेल्वे जंक्शनचा लवकरच कायापालट; प्रवासी सुविधांत होणार मोठी वाढ !

मिरज रेल्वे जंक्शन

मिरज (जिल्हा सांगली) – दक्षिण भारताचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्‍या मिरज रेल्वे जंक्शनच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीच्या १२७ व्या बैठकीत यासह सातारा-कराड-कोल्हापूर विभागातील प्रवासी सेवा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या वेळी सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत, सुकुमार पाटील यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी किशोर मिश्रा, अमित मंडल, उमंग दुबे आदी उपस्थित होते.

‘कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस’ पुन्हा चालू करण्यासह कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस चालू करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. उन्हाळी सुट्ट्यांसाठी लातूर, जयनगर आणि कटिहार मार्गांवर विशेष गाड्या सोडण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. भिलवडी रेल्वेस्थानकावरील अनेक वर्षांपासून रखडलेला ‘फूट ओव्हर ब्रीज’ पुढील ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. ‘मिरज-हजरत निजामुद्दीन दर्शन एक्स्प्रेस’च्या वेळेत अर्धा घंटा पालट होण्याचे संकेत मिळाले आहेत, तसेच सांगली-परळी एक्स्प्रेसला ‘आय.सी.एफ्’ (स्लिपर आणि वातानुकूलित) डबे जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. सह्याद्री एक्सप्रेस ही गाडी प्रथम खडकीपर्यंत आणि त्यानंतर २ महिन्यांनी पनवेलपर्यंत नेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.