पुणे येथे ‘आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ पुस्तकाचे प्रकाशन !

पुणे – सध्याच्या परिस्थितीत भारतियांचा ‘आत्मबोध’ क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती पालटणे आवश्यक आहे. इतिहासात असा आत्मबोध केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांनाच होता. आजच्या काळात आत्मबोध पक्का करणे आणि समाजाला खर्या शत्रूंची ओळख करून देणे हेच मोठे आव्हान आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ विचारवंत आणि साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी केले. ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ‘आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
केतकर म्हणाले की, नेहरूंच्या काळात स्वधर्म, स्वदेशी आणि स्वभाषा या संकल्पना क्षीण झाल्या होत्या. भारतीय असण्याची लाज वाटू लागली होती; मात्र आता परिस्थिती पालटत आहे. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु ।’ (सगळे सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण विश्वच कुटुंब आहे) ही मूल्ये केवळ भारतातच जोपासली जातात.
इतिहास संघर्षाच्या विचारधारेतून घडतो ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक
पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे प्रसिद्ध लेखक अभिजित जोग म्हणाले, ‘‘इतिहास हा संघर्षाच्या विचारधारेमधून घडतो. एकच विचारधारा उरेल आणि ती राबवता येईल, ही समजूत चुकीची आहे. शहरी नक्षलवाद, जागतिक बाजारपेठ व्यवस्था, ख्रिश्चॅनिटी आणि मूलतत्त्ववादी इस्लाम या ४ निरंकुशतावादी शक्ती आहेत. त्या आपापसांत स्पर्धक असल्या, तरी भारताविरुद्ध मात्र त्या एकत्र येतात; कारण भारताचा विचार हा त्यांच्या निरंकुशतेला दिलेले उत्तर आहे. हे युद्ध प्रत्यक्ष नसून अंतर्गत बंडाळी माजवून समाज उद्ध्वस्त करणे आणि राष्ट्र संपवणे, हा या शक्तींचा मुख्य उद्देश आहे.
या पुस्तकाचे लेखन सागर शिंदे, डॉ. पंकज जयस्वाल, रूपाली भुसारी आणि योगेश्वर घोगले यांनी केले आहे. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाचा आरंभ झाला. या वेळी ‘विश्व संवाद केंद्रा’चे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !