फ्रान्सिस झेविअरचा खरा इतिहास जगासमोर आणण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही !

  • हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे विधान

  • खट्टरबंधू यांच्या अटकेचा महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठांद्वारे निषेध !

  • ‘गोवा हिंदू रक्षा मंच’च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन !

मुंबई, २६ एप्रिल (वार्ता.) – फ्रान्सिस झेविअर याला तुम्ही भलेही संत मानत असाल, त्याला आमची हरकत नाही; परंतु त्यामुळे सत्य दडवता येणार नाही. तुमचा इतिहास लाजिरवाणा असेल, तर त्याची लाज तुम्हाला वाटायला हवी. फ्रान्सिस झेविअर याच्या अत्याचारांचा खरा इतिहास जगापुढे आणण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, त्यासाठी आम्ही गोव्यात वैध आंदोलनही करू, अशी ठाम भूमिका हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मांडली.

गोवा येथील खट्टरबंधूंच्या अटकेच्या निषेधार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये २६ एप्रिल या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुलकर्णी हे उपस्थित होते. ‘गोवा हिंदू रक्षा मंच’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डावीकडून श्री. समीर कुलकर्णी, श्री. रणजित सावरकर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील ‘हात कातरो’ खांबावर सहस्रो हिंदूंचे हात तोडणे असो किंवा सारस्वत ब्राह्मणांवर केलेले अत्याचार असोत, फ्रान्सिस झेविअर याचे हे हिंदूंवरील अत्याचार दडपण्यासाठी खट्टरबंधूंना अटक करण्यात आली आहे. फ्रान्सिस झेविअर याचा खरा इतिहास लोकांसमोर येऊ नये, यासाठी हे दबावतंत्र वापरले जात आहे. फ्रान्सिस झेविअर याच्या अत्याचाराविषयीची पत्रे भारत आणि पोर्तुगाल सरकारकडे उपलब्ध आहेत. जर्मनीने हिटलरच्या अत्याचाराविषयी क्षमायाचना केली, मग फ्रान्सिस झेविअर याच्या अत्याचाराचा इतिहास का पुढे येऊ नये ?’’

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी गोवा येथील एका कार्यक्रमामध्ये सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यावरून प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. गौतम खट्टर यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. श्री. गौतम खट्टर घरी सापडले नाहीत, म्हणून गोवा पोलिसांनी त्यांचे १८ वर्षांचे लहान बंधू श्री. माधव खट्टर यांना अटक केली. श्री. गौतम खट्टर यांना भाषण लिहून दिल्याच्या खोट्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी २४ एप्रिल या दिवशी श्री. गौतम खट्टर यांना हिमाचल प्रदेश येथून पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

गोवा सरकारने झेविअरविषयीची कागदपत्रे सार्वजनिक करावीत !

हिंदूंवर अत्याचार करणारा फ्रान्सिस झेविअर ख्रिस्त्यांना हवा आहे; परंतु गोवा मुक्तीसाठी मोठे योगदान देणारे पीटर अल्वारेस नको आहेत. या देशात जर मनुस्मृति जाळण्यात येत असेल, तर फ्रान्सिस झेविअर याच्या अत्याचाराविषयीही बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. गोवा सरकारने तज्ञांची समिती नेमून १-२ महिन्यांत फ्रान्सिस झेविअर याच्या कारनाम्यांची कागदपत्रे सार्वजनिक करावीत. त्याविषयी नागरिकांना मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

गोवा सरकारला झुकवून हिंदूंवर दबाव ! 

झाकीर नाईक याने श्री गणेशाविषयी अवमानकारक वक्तव्य करूनही त्याला अटक झाली नाही. म.फी. हुसेन याने हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढली, महाराष्ट्रात माता सरस्वतीविषयी अवमानकारक वक्तव्य करण्यात आले, पुरुषोत्तम खेडेकर यांनी ब्राह्मण स्त्रियांविषयी अवमानकारक वक्तव्य केले, अशा प्रकारे हिंदूंचा अवमान करणार्‍यांना शिक्षा होत नाही. हिंदुत्वनिष्ठ सरकार असलेल्या राज्यांत असे प्रकार घडतात, तेव्हा लाजेने मान खाली जाते. ख्रिस्त्यांनी गोवा सरकारला झुकवून हिंदूंवर दबाव आणला. अन्य धर्मियांसाठी वेगळा आणि हिंदूंसाठी वेगळा न्याय का ?, असा प्रश्न अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी उपस्थित केला.