डिजिटल जनगणना २०२७
जिल्हा प्रशासन सुसज्ज : नागरिकांना स्वतःहून सहभागी होण्याची संधी

रत्नागिरी, (जिमाका) – भारताच्या आगामी डिजिटल जनगणना २०२७ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जय्यत सिद्धता केली असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती लक्षात घेऊन एकूण २७३१ घर यादी गट (एच्.एल.ओ. ब्लॉक्स) निश्चित करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि माहिती संकलनासाठी प्रशासनाने ३१२३ कर्मचार्यांची मोठी फळी तैनात केली आहे. यामध्ये २६२१ प्रगणक आणि ४६० पर्यवेक्षकांचा समावेश असून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी ४२ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय सोयीसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्रामीण भागांसाठी तहसीलदार हे ‘चार्ज ऑफिसर म्हणून दायित्व सांभाळत आहेत, तर शहरी भागांतील नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी संबंधित मुख्याधिकारी यांची ‘चार्ज ऑफिसर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने सर्व नियुक्त कर्मचार्यांना भ्रमणभाष ॲपद्वारे माहिती नोंदवण्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नागरिकांना या जनगणनेत स्वतःहून सहभागी होण्याची संधी देण्यात आली असून १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन प्रक्रिया राबवली जाणार आहे. नागरिक secensus.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतात. पोर्टलवर विचारण्यात आलेल्या एकूण ३४ प्रश्नांची अचूक आणि प्रामाणिक उत्तरे भरून माहिती सबमिट केल्यानंतर नागरिकांना एक ‘एसई आयडी’ प्राप्त होईल. हा ‘आयडी’ जपून ठेवणे आवश्यक असून, जेव्हा प्रगणक घरोघरी भेटी देतील तेव्हा त्यांना हा ‘आयडी’ दाखवावा लागेल.
जिल्ह्यात घर यादी आणि गृहनिर्माण जनगणनेचा (एचएलओ) पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या काळात पूर्ण केला जाणार आहे. जनगणनेचे हे काम राष्ट्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी अधिकृत पोर्टलचा वापर करून माहिती भरावी किंवा घरी येणार्या प्रगणकांना वस्तूनिष्ठ माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा