अक्षय्य तृतीया या दिवशी ‘परशुराम जयंती’ आहे. त्या निमित्त...

१. भगवान परशुरामाने केलेला दैत्यसंहार !
१ अ. शिवाने परशुरामाला परशूच्या साहाय्याने दैत्याच्या पराभवाचे दायित्व देणे : ‘परशुरामाला श्री शंकराकडून अस्त्रप्राप्ती झाली होती. त्या कथेनुसार देव-दानवांचे युद्ध झाले. त्यात दानवांनी देवांचा पराभव केला. इंद्रासहित सर्व देव चिंताग्रस्त झाले होते. त्यांना साल्व दैत्याचा प्रचंड त्रास झाला होता. सर्वांनी शिवाला प्रार्थना केली, ‘‘कोणत्याही रितीने या दैत्याचा पराभव व्हावा आणि सर्व देवादिकांना भयमुक्त होता यावे.’’ शंकराने परशुरामाला सांगितले, ‘‘साल्वाचा पाडाव करण्याचे कार्य तू हाती घे. हे दायित्व तू समर्थपणे पेलशील, अशी मला निश्चिती आहे.’’ त्यावर परशुरामाने हात जोडून सांगितले, ‘‘हे भगवान, जर त्या साल्वापुढे प्रत्यक्ष इंद्राची धडकत (धाडस) लागली नाही, तर मी एकटा काय करणार ? प्रभावी शस्त्रांविना मी दैत्यांचा नाश कसा करणार ?’’ यावर शंकराने शैवास्त्रमय तेज परशुरामाला देत सांगितले, ‘‘मी तुला पूर्वीच दिलेल्या अस्त्रांनी म्हणजे परशूने तू शत्रूशी युद्ध करावे, म्हणजे हे युद्धकौशल्य कसे प्राप्त झाले, ते तुझ्याच लक्षात येईल.’’
१ आ. शिवाने मानवरूपधारी विष्णूला पाडाव करण्यासाठी पाठवल्याचे समजताच साल्व दैत्याने त्यांनाच जिंकून घेण्याचा निश्चय करणे : परशुराम साल्वाचा नाश करण्याच्या कामगिरीवर निघताच सर्वत्र उत्पात होऊ लागला. साल्व चिंतामग्न झाला. तो शुक्राचार्यांकडे गेला. त्यांना म्हणाला, ‘‘हे काय चालले आहे ? जर ब्रह्मदेवाची आराधना करून माझ्यासाठी अवध्य (अमर) असण्याचा वर मिळाला आहे, तर मग असे का होत आहे ?’’ त्यावर शुक्राचार्य म्हणाले, ‘‘मातेमुळे ब्रह्माकडून मिळालेल्या वरदानाने, तसेच संजीवनी विद्येने असुरांना जय मिळाला, हे खरेच आहे; परंतु तुझ्या नाशासाठी शिवाने मानवरूपधारी विष्णूला पाठवले आहे. तेव्हा त्यांच्या समवेत युद्ध करण्यापेक्षा इंद्राशी संधी करणे हेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे.’’ त्यावर ‘एका मानवाला घाबरून आम्ही राज्यत्याग करणार नाही. परशुरामाला आमच्याशी युद्ध करायला पाठवले, त्या शिवांनाच आम्ही जिंकू’, असे साल्व म्हणाला.
१ इ. युद्ध न करण्याविषयी अन्यांनी दिलेले उपदेश साल्व दैत्याने अव्हेरले ! : शुक्राचार्य म्हणाले, ‘‘आजपर्यंत देवकार्यासाठी विष्णूंनी अनेक वेळा अवतार घेतले आहेत आणि असुरांचा नाशही केला आहे. तू आता इंद्राशी संधी घडवणे हेच योग्य आहे. त्यामुळे तुमचा सर्वनाश टळेल.’’ तथापि हा उपदेश साल्वाला पटला नाही. त्याने युद्ध करायचे ठरवले. महाविष्णूंनी अवतार घेऊन पूर्वी अनेक दैत्यांचा नाश केला होता, हे त्याला ठाऊक होते, तरीसुद्धा त्याने हे युद्ध करायचे ठरवले.

त्याची धारणा होती की, जर विष्णूंकडून युद्धात मरण आले, तर ते पत्करू. विशिष्ट व्यक्तीकडून मरण येणे हे इष्ट असते. त्यामुळे ज्यांनी त्याला उपदेश केला, तो त्याने अव्हेरला. अशा वेळी त्याचा धाकटा भाऊ राहू त्याला म्हणाला, ‘‘ज्यांच्या क्रोधामुळे आपण अंगहीन झालो आणि ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला ग्रहत्व प्राप्त झाले, त्या विष्णूशी वैर करणे मला योग्य वाटत नाही.’’ ‘विष्णूकडून मरण आल्यास उत्तम गती प्राप्त होईल आणि स्वर्गलोकी आपली भावाभावांची भेट होईल’, असे सांगून साल्वाने त्याचे तोंड बंद केले.
१ ई. शिवासह परशुरामाचाही युद्धात नाश करणार असल्याचे दैत्याने सांगणे : परशुरामाने त्याचा दूत म्हणून अकृतव्रणाला साल्वाकडे पाठवले आणि निरोप दिला की, शिवाने मला तुझ्याशी युद्ध करायला सांगितले असल्यामुळे तू सिद्धता कर. इंद्राला युद्धात जिंकून देवादिकांना जो त्रास दिला आहेस, त्याचे फळ भोगण्यासाठी सिद्ध हो. यावर ‘परशुरामाची या कामी ज्या शिवाने नियुक्ती केली आहे, त्या शिवालाच मी रणात जिंकेन. माझ्यासमवेत जर परशुरामाला युद्ध करायचे असेल, तर त्याचाही मी युद्धात नाश करीन’, एवढेच उत्तर देऊन साल्व थांबला नाही, तर त्याने युद्धाची सिद्धता चालू केली.
१ उ. …आणि परशुरामाने परशू फेकून साल्व दैत्याचे मस्तक उडवले ! : चतुरंग सेनेच्या समवेत तो रणात उतरला. साल्वानेच युद्धाला तोंड फोडले. त्याने त्याची विविध अस्त्रे परशुरामावर फेकली; पण परशुराम स्थिर उभा होता. अंगावर चालून आलेल्या सैनिकांची त्याने हत्या केली. साल्वाने परशुरामावर हत्ती सोडला. केवळ हुंकाराच्या साहाय्याने परशुरामाने हत्तीच्या वेगावर बंधन आणले. परशुरामाने परशू साल्वावर फेकला आणि त्याचे मस्तक उडवले. साल्व रणात पडलेला बघून उरलेले सर्व दैत्य समुद्राकडे निघून गेले. अशा प्रकारे इंद्राला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले.
२. शंकराने प्रसन्न होऊन परशुरामाला दिलेले त्याचे संपूर्ण अस्त्रग्राम !
भगवान आशुतोषांनी (शिवाने) घेतलेल्या परीक्षेत परशुराम उत्तीर्ण झाला. त्यामुळे शिव प्रसन्न होऊन त्याला म्हणाला, ‘‘मी माझे पूर्ण अस्त्रग्राम (अस्त्रांचा खजिना) तुला देतो. त्याचा स्वीकार कर.’’ परशुरामासमोर जणू अस्त्रांचा खजिना साक्षात् प्रगटला होता. त्या अस्त्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ब्रह्मास्त्र, वैष्णव, रौद्र, आग्नेय, वासव, नैऋत, याम्य, कौबेर, वारुण, वायव्य, सौम्य, सौर, पार्वत, चक्र, वज्र, पाश, सर्प, गांधर्व, स्वापन, भौत, पाशुपत, ऐशिक, तर्जन, प्रास, भारुड, नर्तन, अस्त्ररोधन, आदित्य, रैवत, मानव, अक्षिसंतर्जन, भीम, ज्रुम्भण, रोधन, पर्जन्य, राक्षस, मोहन, कालास्त्र, दानवास्त्र, ब्रह्मशिरस अशी सर्व अस्त्रे समंत्रक, सप्रयोग आणि संहार शक्तींनी युक्त अशी परशुरामाला मिळाली. दिव्य धनुष्य, अक्षय भाता, तीक्ष्ण बाण, अभेद्यकवच आणि मंत्रप्रभाव आदी अनेक वर शिवाने त्याला दिले.
३. शिवाने विराटपुरुष महानारायणांचे ध्यान करत असल्याचे परशुरामाला सांगणे
एक दिवस शिवाला ध्यानावस्थेत पाहिल्यावर परशुरामाने विचारले, ‘‘हे प्रभो, सर्व देव आणि ऋषि तुमचे पूजन करतात, मग तुम्ही कुणाचे ध्यान करता ?’’ या पृच्छेवर शिव म्हणाला, ‘‘बाळा, मी विराटपुरुष असलेल्या महानारायणांचे सतत ध्यान करतो.’’
४. परशुरामाने अधर्मी क्षत्रियांच्या नाशाची प्रतिज्ञा सांगितल्यावर ब्रह्मदेवाने शिवाची अनुज्ञा घेण्यास सांगणे
जमदग्नीऋषींचा वध झाल्यानंतर रेणुकामातेने सहगमन केले. त्यानंतर त्यांची अंत्येष्टी पूर्ण करून निघालेला परशुराम ब्रह्मदेवाच्या दर्शनासाठी गेला. ब्रह्मदेवाने त्याचे कुशल विचारून आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवाने सांगितले, ‘‘हे वत्सा, कशासाठी येथे आला आहेस ?’’ त्यावर परशुरामाने आदरपूर्वक अभिवादन करून सर्व वृत्तांत सांगितला. अधर्मी क्षत्रियांच्या नाशाची प्रतिज्ञासुद्धा सांगितली. ते ऐकल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ‘‘क्रोधाच्या भरात तू भयंकर प्रतिज्ञा केली आहेस. परमात्म्याच्या इच्छेने सृष्टी निर्माण झाली आहे. त्याच्याच इच्छेने ती चालते. त्यात ढवळाढवळ करू नये; परंतु अधर्मी असलेल्यांना धडा शिकवायला हवा. शिवाकडून अनेकांना अत्यंत भयंकर शक्ती प्राप्त झालेली आहे. अशा असंख्य विरांचा नाश करायचा असेल, तर त्यांचीच अनुज्ञा घेणे योग्य ठरेल. तू त्यांच्याकडे जा. त्यांनी जर कृष्णमंत्र आणि त्रैलोक्यविजयकवच देण्याची कृपा तुझ्यावर केली, तर तुला प्रतिज्ञा पूर्ण करता येईल. त्यांच्या मनात आले, तर ते प्रत्यक्ष ‘पाशूपतास्त्र’ देतील.’’
५. युद्धात रक्षण होण्यासाठी शंकराने परशुरामाला ‘त्रैलोक्य विजय’ कवच देणे
ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार परशुराम शिवलोकी गेला. त्याने शिवाला वंदन करून आपला उद्देश सांगितला. शिवाने प्रिय शिष्याची विनंती ऐकून थोडा विचार करत शेजारी असलेल्या भगवतीमाता भवानीकडे पाहिले. त्या म्हणाल्या, ‘‘हे परशुरामा, पृथ्वीवरील पराक्रमी; परंतु अधर्मी क्षत्रियांचा नि:पात करण्याची प्रतिज्ञा तू घेतली आहेस खरी; परंतु भगवान आशुतोषाने कृपा केल्यासच ते शक्य आहे.’’ शंकराने परशुरामाला प्रतिज्ञापूर्तीसाठी श्रीकृष्णमंत्राचे अनुष्ठान करायला सांगितले. युद्धात रक्षण होण्यासाठी ‘त्रैलोक्यविजय’ कवच दिले. शिव, माता भवानी, कार्तिकेय आणि गणेश यांना नमस्कार करून परशुरामाने शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घातली.
६. परशुरामाच्या दिव्यत्वाची प्रचीती दर्शवणारी घटना !
६ अ. परशुरामाला भयग्रस्त हरणाचे जोडपे दिसणे : परशुराम मंत्रसिद्धीसाठी पुष्कर तीर्थावर जायला निघाला. तिथे येताच त्याने साधनेला प्रारंभ केला. परशुराम तपस्येला बसलेला असतांना त्याचा दूत अकृतव्रण समिधा, फुले आणि कंदमुळे आणायला वनात जात असे. एकदा परशुराम मध्यम पुष्कर येथे स्नानासाठी गेल्यावर चमत्कारिक घटना पाहिली. हरणाचे एक जोडपे भयग्रस्त होऊन जलाशयाचे पाणी पीत होते. तेथे एक व्याध (शिकारी) पोचला. त्याने आडोशाला जाऊन धनुष्य सज्ज केले. तेवढ्यात त्याला पलीकडच्या तीरावरील परशुराम आणि अकृतव्रण दिसले. प्रत्यक्ष सहस्रार्जुनाचा नाश करणारा परशुराम समोर असतांना ‘त्या मृगांना आपण कसे मारणार ?’, या विचाराने तो खांद्यावर धनुष्य चढवून तसाच उभा राहिला. मृगांनी परशुरामाला पाहिले. परशुरामाच्या मनात विचार आला की, येथे वाघाची गर्जना ऐकू येत नाही किंवा व्याधही दिसत नाही. मग यांना कसली भीती ? तेवढ्यात पाणी संपवून हरणाचे जोडपे इकडे-तिकडे पहात होते.
६ आ. परशुरामाच्या कृपेमुळे हरिणाला लाभलेली दिव्य दृष्टी ! : परशुरामही अकृतव्रणासह तेथेच थांबला. हरिणी हरिणाला म्हणाली, ‘‘परशुरामासारखा वीर असतांना आपल्याला भीती कशाची ? एखाद्या व्याधाने जर आपल्यावर प्रहार करायचे ठरवले, तर निरपराध्यांवर प्रहार करणारा तो व्याधच नष्ट होऊन जाईल. जोपर्यंत भार्गवराम इथे आहेत, तोपर्यंत आपणही येथेच थांबूया.’’ त्यावर मृग म्हणाला, ‘‘मलापण परशुरामाचा पराक्रम ठाऊक आहे. त्याच्या शेजारी जो अकृतव्रण आहे, त्यालाही पूर्वी परशुरामाने वाघापासून वाचवले होते. पित्याच्या वधानंतर त्याने अधर्मी क्षत्रियांच्या नाशाची घोर प्रतिज्ञा केली आहे. तिच्या पूर्ततेसाठी परशुराम नुकताच ब्रह्मलोकी गेला होता. ब्रह्माने त्याला शिवाकडे पाठवले आणि शिवाने कृपावंत होऊन श्रीकृष्ण मंत्र अन् विजयकवच दिले. त्याच्या सिद्धीसाठी परशुराम या तीर्थावर आला आहे; परंतु त्याची मंत्रसिद्धी अद्याप झाली नसावी.’’ हरिणीने आश्चर्याने विचारले, ‘‘तुला हे सर्व कसे ठाऊक ?’’ हरीण म्हणाले, ‘‘परशुरामाच्या दर्शनाने आपण पावन झालो आहोत. केवळ त्याच्याच कृपेमुळे हे सगळे ज्ञान मला झाले. तिन्ही लोकांतील प्राणिमात्रांचे शुभाशुभ मी जाणू शकतो. परशुराम जे कार्य पुढे करणार आहे, तेसुद्धा मला दिसत आहे. त्याच्या भक्तीसाधनेमुळे त्याचा मंत्र सिद्ध होईल आणि त्यातूनच त्याची प्रतिज्ञाही सफल होणार आहे.’’ मंत्रसिद्धीसाठी पुष्कर तीर्थावर साधना चालू असतांना भार्गवरामाच्या केवळ दर्शनाने हरणाचे जोडपे पुनीत झाले आणि मृगाला दिव्यज्ञान अन् दिव्यदृष्टी प्राप्त झाली, यावरून परशुरामाचा दिव्य प्रभाव लक्षात येतो. त्याच्या चिरंजीव कार्याची कथा समोर येते.
७. परशू शस्त्राची महती !
परशू हे पाणीमुक्त शस्त्र असल्याचे म्हटले जाते. मंत्रसामर्थ्याने ते दूरवर फेकता येते आणि काम करून झाल्यानंतर ते फेकणार्याच्या हातात परत येते. परशू फेकण्याच्या पद्धतीला ‘हात ’म्हणतात. हे ‘हात’ सहा प्रकारचे सांगितले आहेत. कराल, अवघात, दंशोपप्लुत, क्षिप्त, हस्तव आणि शून्य हे ते ६ प्रकार होय. धनुर्वेदावरील ग्रंथात परशूविषयी काही शास्त्रीय माहिती मिळते.
८. परशुरामाला शस्त्रे धारण करण्याची शक्ती प्राप्त झाली नसल्याने शिवाने पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास सांगणे
एकीकडे वेदाध्ययन आणि दुसरीकडे शस्त्रास्त्र शिक्षण चालू असतांना जमदग्नींनी केवळ परशुरामालाच ‘परशू’ हे शस्त्र दिले. परशुराम जेव्हा तपश्चर्या आणि शस्त्रविद्येतील रहस्ये ठाऊक व्हावीत, यांसाठी कैलासावर जाऊन ‘शिव आराधना’ करू लागला, तेव्हा प्रसन्न होऊन शंकराने त्याला सांगितले, ‘‘हे वत्सा, शस्त्रे धारण करण्याची शक्ती अद्याप तुझ्यात आलेली नाही. तू अद्यापही तुझी तपश्चर्या चालू ठेव. त्यानंतर सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा करून सर्व तीर्थावर जाऊन स्नान करून पवित्र देह प्राप्त करून घे आणि मग माझ्याकडे ये.’’
९. परशुरामाने ‘शिल्पशास्त्रा’च्या साहाय्याने हिमालयाची दरी फोडून ब्रह्मपुत्रेचा प्रवाह वळवला
तपस्या संपवून तो पृथ्वी प्रदक्षिणेसह तीर्थांना भेट द्यायला निघाला. आग्नेय दिशेकडील ब्रह्मकुंडावर त्याने स्नान केले. तेव्हा ब्रह्मपुत्र नदी हिमनगांनी अडवली असल्याचे त्याला दिसले. ‘तेथे साठलेले पवित्र जल भूसपाटीवर न्यावे’, असे त्याला वाटले; म्हणून त्याने हिमालयाची दरी फोडून ब्रह्मपुत्रेचा पूर्वेकडील प्रवाह पालटून दक्षिणेकडे वळवला. अर्थात् भार्गव कुळासाठी तसे करणे कठीण नव्हते. या कुळाने ‘शिल्पशास्त्र’ प्रवर्तित केले होते. किंबहुना शिल्पशास्त्र हे त्यांच्या कुळामध्ये एक महत्त्वाचे शास्त्र म्हणून जोपासले जात होते.
पश्चिम किनार्यावर आल्यावर परशुरामाने प्रभासक्षेत्री तपश्चर्या केली. त्या भूमीवर महादेवांचे दिव्य लिंग स्थापन केले. त्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्या लिंगात नेहमीच वास करण्याचे आश्वासन दिले.
१०. शिवाने परशुरामाला चारही दिशांना जाण्यास सांगितल्यामागील कारण
ज्या पुण्यपावन क्षेत्री परशुराम गेला, तेथे त्याला ऋषिमुनींचे दर्शन झाले. वेदमंत्रांचा घोष आणि यज्ञ-यागादी कर्मे चालू असलेली त्याला दिसायची. पृथ्वी प्रदक्षिणेमुळे सर्व प्रदेशांतील लोकांचे आकलन व्हावे आणि मानवी कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा, यासाठी शिवाने त्याला चारही दिशांना जाण्यास सांगितले होते.
११. तपश्चर्येनंतर परशुराम शस्त्रविद्येत प्रवीण झाल्याचे शिवाने सांगणे
सर्वत्र जाऊन आल्यावर त्याने तपश्चर्येला प्रारंभ केला. तेव्हा शंकर प्रकट होऊन म्हणाला, ‘‘हे भार्गवा, अस्त्रांच्या धारणेसाठी तू एकच शक्तीमान आणि योग्य आहेस. तुझे धैर्य आणि सात्त्विक भाव पहाता तुझ्यावर प्रसन्न होऊन मी माझे अस्त्रग्राम तुला प्रदान करतो. शस्त्रविद्येत प्रवीण झाल्यामुळे तुला तुझ्या पित्याकडे जायला हरकत नाही. तुझ्या वडिलांनी (जमदग्नींनी) तुला दिलेला दिव्य परशू लक्ष्यावर फेकला असता परतून तुझ्या हातात येईल.’’
१२. परशूमुळे भार्गवराम ‘परशुराम’ म्हणून प्रसिद्ध होणे
शिवाने कृपा करून ते पाणीमुक्त शस्त्र मुक्तसंधारित केले. मंत्रसामर्थ्य वापरून फेकलेले शस्त्र पुनश्च फेकणार्याच्या हातात यावे, ही शिवकृपा होय. ‘यापुढे हा परशू हेच तुझे उपलक्षण (प्रतीक) होईल’, असे शिवाने सांगितले. त्यानंतर राम हा जमदग्नी पुत्र म्हणून ‘जामदग्न्य’, भृगु कुळात जन्माला आलेला म्हणून ‘भार्गवराम’ आणि नंतर परशू हाती आल्यामुळे ‘परशुराम’ या नावांनी प्रसिद्ध झाला. ब्रह्मांड पुराणानुसार सर्व शस्त्रांना मागे टाकणारा किंवा भारी पडणारा असा तो परशू होईल; म्हणून परशूला ‘आत्मीय’ असे म्हटले आहे.’
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक, डोंबिवली.
(गंधर्ववेद प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सप्तचिरंजीव मालिकेतील ‘परशुराम’ चरित्रातील एका महत्त्वपूर्ण प्रकरणातील काही भाग.)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !