९ घंट्यांनी धावपट्टी चालू, अनेक विमाने रहित !
(‘हार्ड लँडिंग’ म्हणजे विमान धावपट्टीवर सामान्यापेक्षा अधिक वेगाने आणि जोरात आदळणे. लँडिंग सहज न होता मोठा धक्का बसल्यासारखे होते.)

पुणे – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७ एप्रिलच्या रात्री १०.२५ वाजता भारतीय वायूदलाच्या ‘सुखोई ३० एम्.के.आय.’ हे लढाऊ विमान धावपट्टीवर उतरतांना ‘अंडरकॅरेज फेल्युअर’ (लँडिंग गिअरमध्ये बिघाड) झाले. यामुळे विमानाचे ‘हार्ड लँडिंग’ झाले आणि विमान धावपट्टीच्या मध्यभागी अडकून पडले. सुदैवाने विमानातील वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेची हानी झाली नाही, अशी माहिती वायूदलाने दिली.
१. या घटनेमुळे लोहगाव विमानतळाची धावपट्टी ९ घंटे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुण्याकडे येणारी आणि येथून उड्डाण करणारी ३० हून अधिक विमाने रहित झाली किंवा वळवण्यात आली. पुणे विमानतळ हे दुहेरी वापराच्या पद्धतीवर चालत असल्यामुळे येथे नागरी आणि सैनिकी दोन्ही उड्डाणे होतात, त्यामुळे या घटनेचा परिणाम अधिक व्यापक झाला. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेची नोंद घेत तात्काळ वायूदल आणि विमानतळ प्रशासन यांच्याशी संपर्क साधला.
२. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सामाजिक माध्यमाद्वारे विमानतळाविषयी माहिती दिली. धावपट्टीवर अडकलेले लढाऊ विमान हटवण्यासाठी क्रेन आणि अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. वायूदलाच्या तांत्रिक पथकाने रात्रभर काम करून धावपट्टी पुन्हा कार्यान्वित केली. मुरलीधर मोहोळ यांनी विमानसेवा पूर्ववत् झाल्याची माहिती दिली. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सकाळी ७.३० वाजल्यापासून विमानांचे उड्डाण आणि सकाळी ८.०० वाजल्यापासून ‘लँडिंग’ चालू करण्यात आले आहे. वायूदलाने या घटनेच्या सखोल चौकशीसाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हे ‘हार्ड लँडिंग’ झाले कि अन्य काही कारण होते, याचा शोध घेतला जाणार आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !