
भारतासारख्या आशियाई देशांनाच नव्हे, तर जगातील अनेक देशांच्या दृष्टीने ‘युनायटेड अरब अमिरात’ (युएई) या देशाचा महत्त्वाचा भाग असलेले दुबई हे शहर एका स्वप्ननगरीप्रमाणे आहे. तेथील सुरस कथा ऐकण्यासाठी अजूनही अनेक जण उत्सुक असतात. भारतातील विशेषतः चित्रपटसृष्टीतील वलयांकित व्यक्ती, नेते, उद्योजक किंवा कुख्यात गुंड यांच्यासाठी दुबई म्हणजे मेजवान्या करण्याचे आणि व्यावसायिक बोलणी करण्याचे ठिकाण आहे. दुबईतील जगातील सर्वांत उंच ‘बुर्ज खलिफा’ इमारतीतील भारतीय श्रीमंतांची घरे हा विशेषतः एक चर्चेचा विषय असतो. ‘युएई’सह दुबईमध्ये उच्च श्रेणीतील नोकर्या, व्यवसाय यांपासून कामगारांपर्यंत भारतियांची संख्या प्रचंड आहे. दुबईत १५ ते २० लाख, म्हणजे लोकसंख्येच्या ४० टक्के भारतीय आहेत. अर्थातच ही स्वप्ननगरी दुबई निर्माण करण्यात तेथील दूरदृष्टी असलेले दुबईचे तत्कालीन शासक शेख रशीद बीन सईद अल् मकदूम यांनी वर्ष १९६० ते १९९० या काळात प्रचंड मेहनत घेतली होती. नियोजनबद्धरित्या दुबईचा अत्याधुनिक पद्धतीने विकास केला. पर्यटनाचा आदर्श निर्माण करण्यासाठी जे जे म्हणून लागते, ते सर्व काही तेथे आहे. विशेषतः तेथील पोलीस प्रशासन आणि कायदा अन् सुव्यवस्था ! दुबईत चोर्या आणि स्त्रियांवर सार्वजनिक ठिकाणी होणारे अत्याचारही अत्यंत अत्यल्प आहेत; कारण या प्रकरणांत तिथे अतिशय कठोर कारवाई केली जाते. तेथील ही सुरक्षितता दुबईला स्वप्ननगरी म्हणून मिरवण्यात मोठा वाटा उचलते. करमुक्त असूनही दुबई हे स्थिर अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणून उदयास आले. अन्य इस्लामिक देशांमध्ये काही ना काही कारणामुळे अशांतता असली, तरी दुबईने स्वतःला यापासून दूर ठेवले. या तटस्थपणामुळे ती यशस्वी झाली. वाळवंटासारख्या ठिकाणी अमेरिकेतील शहरांशी तोडीस तोड नगरी उभी करणे सोपे काम नव्हते; परंतु शेख यांनी बंदरे, पूल, रस्ते, उंच इमारती आदी उभे करून दुबईला एक जागतिक पर्यटन आणि व्यापार केंद्र अन् मायानगरी बनवले. त्यांचा मुलगा महंमद बीन रशीद यानेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तिला अत्याधुनिक जागतिक शहर बनवून पुढे नेले. जगभरातून तिथे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वडिलांनी आखलेल्या धोरणांचा विकास केला. येथील उंचच उंच इमारती वास्तूकलेसमवेतच वाळवंटातील परमोच्च इच्छाशक्तीचा विजय म्हणून मिरवतात. वर्ष १९९० मध्ये झालेले आखाती युद्ध किंवा कोरोना महामारीनंतर जगावर आलेले आर्थिक संकट दुबईने लीलया पेलले; पण तिच्यावर परिणाम होऊ दिला नाही.

युद्धाचे दूरगामी परिणाम !
आता मात्र अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा मोठा परिणाम जगाप्रमाणेच गगनचुंबी इमारतींची ही नगरी आणि जागतिक व्यापार केंद्र असलेल्या दुबईवर झाला आहे. अमेरिकेच्या मालमत्ता आणि तळ असलेल्या दुबईतील स्थानांवर इराणने ड्रोन आक्रमणे केली. दुबईतील भारतीय किंवा पर्यटक यांच्यावर त्यांचा विशेष परिणाम झाला नाही. भारतियांनी त्यांच्या तेथील जीवलगांना संपर्क केल्यावर ते सुरक्षित किंबहुना मजेत असल्याचे चित्रण त्यांना पाठवले खरे; परंतु आता जवळजवळ दीड महिना उलटून गेल्यावर या युद्धाचे दुबईवरील दूरगामी परिणाम समोर यायला लागले आहेत; ते कदाचित् इतके गंभीर असू शकतात की, युद्ध असेच चालू राहिल्यास परत तिथे उंटावरून फिरण्याची वेळ आली नाही म्हणजे मिळवले !
जगात सर्वांत व्यस्त असलेल्या येथील विमानतळावरील विमानांना लांबचा पर्यायी मार्ग शोधावा लागलेला आहे. अनेक उड्डाणे रहित करावी लागली. युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याने तिकिटाचे दरही वाढले, तसेच युद्धामुळे एक प्रकारची भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. या दोन्हींमुळे पर्यटकांची संख्या थेट १५ ते ५० टक्क्यांनी न्यून झाली आहे. पर्यटन व्यवसायात अंदाजे साडेपाच सहस्र कोटी रुपये हानी प्रतिदिन होत असल्याचे म्हटले जात आहे. काही वृत्तांनुसार पर्यटक येणे जवळजवळ बंदच झाले आहे, तर काहींच्या मते हा युद्धाचा तात्पुरता परिणाम असू शकतो; पण युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही, ही सध्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे होणारे काही आंतरराष्ट्रीय महोत्सव किंवा मेजवान्या, समारंभ आदी कार्यक्रमांसाठी येणारे पर्यटक येईनासे झाले आहेत. महागडी हॉटेल्स, त्यांतील कामगार, ‘मॉल’, मनोरंजन, स्थानिक बाजार आदी व्यवसायांवर पर्यटक, तसेच कच्च्या मालाच्या अभावी परिणाम झाला आहे. हॉटेल व्यवसाय ७० ते ८० टक्के बंद झाल्याची वृत्ते येत आहेत. अब्जावधीची गुंतवणूक बुडल्याने शेअर (समभाग) बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास न्यून होत आहे. हॉर्मुझसारख्या सामुद्रधुनीचे मार्ग बंद झाल्याने आयात-निर्यात महाग अन् कठीण झाली आहे. रशिया, चीन यांसारख्या देशांशी जोडलेले येथील बंदरावरील मालाचे आयात-निर्यात केंद्र निष्क्रीय होत आहे. युद्धामुळे नौकांचे मार्ग आणि माल पुरवठ्याची साखळी (सप्लाय चेन) यांवर मर्यादा आल्या आहेत. तेलाच्या किमती जगभर वाढल्याने त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्यावर होऊ शकतो आणि त्याचा परिणाम पर्यटनावर होऊ शकतो. युद्धग्रस्त भागातून लोक आश्रयासाठी दुबईकडे वळत आहेत. त्यामुळे दुबईची लोकसंख्या वाढून दुबईतील मूलभूत सुविधांवर ताण येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या सर्वांमुळे ‘पर्यटन केंद्र दुबई आता सुरक्षित आहे का ?’, असा प्रश्न निर्माण झाला आहे. युद्धाच्या अप्रत्यक्ष परिणामांमुळे दुबईची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळत आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग युद्धामुळे बंद झाल्याने अनेक मोठे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार तेथील गुंतवणूक काढून घेतात कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय आस्थापने त्यांची कार्यालये भारत किंवा अन्य देशांत हालवण्याची चिन्हे आहेत. युद्धामुळे कामगारांनी त्यांच्या देशात परत जाण्यास निघणे आणि कच्चा माल येण्यातील अडथळे यांमुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. युरोप किंवा भारत येथील श्रीमंत लोक हे दुबईतील मालमत्ता खरेदी करतात; ते या युद्धामुळे सावध झाले आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय, जो दुबईच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे, तो डळमळीत होऊ लागल्याची चिन्हे आहेत. नवे गृहप्रकल्प रखडल्याने ३० टक्के मंदी आल्याचे अहवाल आहेत. मालमत्तांच्या किमती १० टक्क्यांनी घसरल्या आहेत. सामान्यांसाठी वीज आणि पाणी यांचे देयक दुप्पट झाले आहे. वाळवंटी भाग असलेल्या आणि पर्यटनाच्या या शहरात धान्य, भाज्या, फळे ९० टक्के आयात कराव्या लागत असल्याने सामान्य नोकरदारांना ते परवडेनासे झाले आहे. अतिशय कष्टाने उभे राहिलेल्या शहराची युद्ध काय स्थिती करू शकते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. जगाला स्वर्ग वाटणार्या दुबईची ही स्थिती युद्धाच्या आरंभी निर्माण झाली आहे. युद्ध अनेक काळ चालू राहिल्यास जगावर त्याचे किती गंभीर परिणाम होतील, याची कल्पना आपण यातून करू शकतो !
| जगातील कुठल्याच मायानगरीतील जीवन शाश्वत नसल्याची जाणीव निर्माण करून देणारे युद्ध मानवाला अंतर्मुख बनवेल, तो सुदिन ! |
संपादकीय : अमेरिकी तरुणांची रचनात्मकता !
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
गोव्यात ‘होम स्टे’ला पंचायत किंवा नगरपालिका यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट नको ! – नीती आयोग
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !
संपादकीय : सतलूज !