हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यासच हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या संदर्भातील सर्वच समस्या सुटतील ! – नीलकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज

सांगली येथील विराट ‘हिंदु धर्म संमेलना’त ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ या संकटांचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज होण्याचा निर्धार !

नीलकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज उपस्थितांना संबोधित करतांना

सांगली, ५ एप्रिल (वार्ता.) – हिंदूंनी जातीपातीच्या भिंती पाडून हिंदु धर्मासाठी एकत्र आले पाहिजे. हिंदु धर्मियांच्या उत्सवांमध्ये हिरीरीने सहभागी होऊन हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून धर्माचरण केले पाहिजे. धर्मावर येणार्‍या विविध संकटांचा सामना करण्यासाठी केवळ वैयक्तिक प्रयत्न पुरेसे नाहीत, तर संपूर्ण समाजाने संघटित शक्ती म्हणून उभे रहाणे आवश्यक आहे, असे परखड मार्गदर्शन नीलकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज यांनी केले. येथील हिंदु एकता आंदोलन सांगली जिल्हा आणि सकल हिंदु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने खणभाग, नळभाग, राजवाडा, फौजदार गल्ली परिसरातील हिंदु बांधवांसाठी चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणात ‘विराट हिंदु धर्म संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्री. कृष्णा जाधव हे होते. प्रारंभी भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संमेलनाचा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या संमेलनास भाजपचे सर्वश्री श्रीकांत शिंदे, बाळासाहेब मोहिते, अधिवक्ता माधवराव कुलकर्णी, शंतनू लिमये, राजू मोहिते, पै. प्रदीप निकम, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदूंना जागृत करण्यासाठी संमेलनाचे  आयोजन ! – नितीन शिंदे, माजी आमदार 

हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे प्रास्ताविकात म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशातील हिंदूंना संघटित करण्यासाठी देशभर ही संमेलने घेतली जात आहेत. धर्मशिक्षण, धर्माचरण आणि धर्मावरील संकटांची माहिती देऊन सुप्त हिंदूंना जागृत करण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे.

हिंदुत्वनिष्ठ सौ. कल्याणी गाडगीळ म्हणाल्या की, पालकांनी मुलांना हिंदु धर्माचे शिक्षण दिले पाहिजे. हिंदु महिलांनी सामाजिक ऐक्य जपण्यासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांना राखी बांधून प्रेमाने जोडून घेतले पाहिजे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री. नितीन देशमाने म्हणाले की, संघ ही देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करणारी संघटना आहे. फाळणी, युद्ध किंवा आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे.

अधिवक्ता गुरुराज रसाळ म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरुद्ध केवळ कायदे असून चालणार नाही, तर हिंदूंनी प्रत्यक्ष संघटित होऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे.

क्षणचित्र – संमेलनाच्या ठिकाणी ‘हर हर महादेव, जय श्रीराम’ अशा दिलेल्या हिंदुत्वाच्या जयघोषाने वातावरण चैतन्यमय झाले होते. धर्माचरणाविषयीचा उत्साह उपस्थितांमध्ये दिसत होता.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यासच हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या संदर्भातील सर्वच समस्या सुटतील !