‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात कठोर भूमिकेची आवश्यकता ! 

 विराट हिंदु संमेलनात आक्रमक भूमिका

प्रभु श्रीरामाच्या मूर्तींचे धर्मप्रेमींना वाटप करतांना आमदार टी. राजा सिंह, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, उजवीकडे संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे

सोलापूर – येथील कर्णिकनगर परिसरातील चिल्ड्रन पार्क येथे झालेल्या विराट हिंदु संमेलनात तेलंगाणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली. यासाठी शासनाने दिनांक आणि वेळ निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या संमेलनात श्रीरामनवमीनिमित्त प्रभु श्रीरामाच्या ५१ मूर्तींचे वाटप करण्यात आले. व्यासपिठावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदु आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मध्यवर्ती महामंडळ उत्सवाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, तसेच संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहर आणि ग्रामीण भागातील गायरान, शासकीय आणि वन विभाग यांच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवून त्यावर बुलडोझर चालवून कारवाई करण्याची मागणी केली. रेल्वे लाईनजवळील झोपडपट्या आणि विमानतळ परिसरातील शासकीय भूमीवरील अतिक्रमणांचा त्यांनी उल्लेख केला.
सोलापूरमधील स्थानिक प्रश्नांवर भाष्य करतांना त्यांनी ‘लँड जिहाद’चा आरोप करत शासकीय भूमीवरील अनधिकृत वापर रोखण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच गोवंश हत्येविषयीही चिंता व्यक्त केली. हिंदु समाजाने संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सज्ज रहावे, असे आवाहन करण्यात आले , कार्यक्रमास मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.