राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा

साखळी, ३ एप्रिल – अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना आणि अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज यांनी गतवर्षी पुरातत्व संचालनालयाच्या सहकार्याने दीपावलीच्या कालावधीत गोव्यात प्रथमच राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन केले होते. दीपावलीच्या दृष्टीने नरकासुराच्या प्रतिमा बनवण्याऐवजी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केल्याने मुलांवर चांगले संस्कार होण्यास साहाय्य झाले आहे. या स्पर्धेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या गोव्यातील कार्याविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळे गोव्यात हिंदु धर्म टिकून राहिला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

सांखळी येथील रवींद्र भवन येथे ३ एप्रिल या दिवशी सायंकाळी राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी सत्कारमूर्ती या नात्याने समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई, ‘अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटने’चे अध्यक्ष श्री. संकेत आर्सेकर, सचिव श्री. सत्यविजय नाईक, ‘मर्दनगड संवर्धन समिती’चे मार्गदर्शक तथा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.

या वेळी मर्दनगडाच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे गोवा सरकारमधील तत्कालीन पुराभिलेख अन् पुरातत्व मंत्री आणि विद्यमान समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन व्हावे, यासाठी गोवा विधानसभेत मागणी करणारे वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांचा या कार्यक्रमात ‘मर्दनगड संवर्धन समिती’ आणि अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना’ यांच्या वतीने आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
‘किल्ले बनवा स्पर्धा’ गावागावात पोचणे आवश्यक ! – मंत्री सुभाष फळदेसाई
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘किल्ले हे केवळ दगडमातीपासून बांधलेल्या प्रतिकृती नाहीत, तर ते आमचा वारसा आणि स्वाभिमान, यांची एक प्रतिकृती आहे. ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आता गावागावात पोचणे आवश्यक आहे आणि यामुळेच हिंदवी स्वराज्य अन् किल्ल्यांचा वारसा सर्वांपर्यंत पोचणार आहे.’’
किल्ल्यांच्या संरक्षणासाठी प्राधिकरण असणे आवश्यक ! – आमदार कृष्णा साळकर
सत्काराला उत्तर देतांना आमदार कृष्णा (दाजी) साळकर म्हणाले, ‘‘पुढील मे महिन्यात फोंडा येथील ‘मर्दनगड’ अधिकृतपणे वारसा स्थळ होणार आहे आणि त्यानंतर या किल्ल्याचे संरक्षण करण्याच्या कार्याला प्रारंभ होणार आहे. गोव्यातील सर्व किल्ल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्यस्तरावर एक प्राधिकरण निर्माण होणे आवश्यक आहे.
किल्ले बनवा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांनी संघटित व्हावे ! – रमेश शिंदे
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘युनेस्को’च्या सूचीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडू येथील १ किल्ला समाविष्ट झालेला आहे. याच धर्तीवर फोंडा येथील ‘मर्दनगड’ ‘युनेस्को’च्या सूचीत समाविष्ट व्हावा, यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत. किल्ले बनवा स्पर्धेच्या निमित्ताने हिंदु संस्कृती, परंपरा आणि धर्मरक्षणाचे कार्य यांसाठी युवकांनी संघटित होणे काळाची आवश्यकता आहे.’’
कार्यक्रमाला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटने’चे अध्यक्ष श्री. संकेत आर्सेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सचिव श्री. सत्यविजय नाईक यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी देसाई आणि श्री. मिथिल फळदेसाई यांनी केले. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. सुहास फळदेसाई यांनीही या वेळी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
| मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी ‘राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धा’ प्रतिवर्षी घ्यावी आणि त्याला गोवा सरकार सदैव पाठिंबा देईल’, असे घोषित केले. |
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !