हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर (पुणे) येथे होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद

डावीकडून श्री. सर्वेश मेहेंदळे, श्री. सुनील घनवट, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, सद्गुरु स्वाती खाडये, श्री. पराग गोखले, श्री. अमित गायकवाड

पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – हडपसर येथे ५ एप्रिल या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गांजवे चौकातील पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेमध्ये सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, वारकरी संप्रदायाचे आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, ‘रुद्रतेज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड, हिंदुत्वनिष्ठ सीए श्री. सर्वेश मेहेंदळे, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे पुणे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले आदी मान्यवर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थित होते. सभेची भव्यता आणि स्वरूप लक्षात यावे; म्हणून सभेचा व्हिडिओ दाखवून पत्रकार परिषदेला आरंभ करण्यात आला.

जागृत हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतील ! – सुनील घनवट

हिंदु राष्ट्राची मागणी का करावी लागते ? वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर जर फाळणी झाली असेल, तर उर्वरित देश हिंदूंचा हवा होता; पण तसे झाले नाही. देशाचा आत्मा हा धर्म आहे. याच राष्ट्र-धर्माच्या विचाराने प्रेरित होऊन हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी देव, देश आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविरोधात आवाज उठवण्यासाठी धर्मपरिवर्तनविरोधी कायदा किंवा लव्ह जिहादविरोधी कायदा संपूर्ण देशात होण्यासाठी ही राष्ट्र-जागृती सभा आहे, असे श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.

जनजागृती केल्यानेच संघटन होणे शक्य ! – सर्वेश मेहेंदळे

राज्यघटनेचा आधार घेऊन काही काळे कायदे बनवण्यात आले आहेत आणि ते हिंदूंवर लादण्यात आले आहेत. प्रार्थनास्थळ विशेष तरतुदी अधिनियम १९९१, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग कायदा १९९२, वक्फ बोर्ड कायदा १९९५ या आणि अशा जुलमी कायद्यांविषयी जनजागृती करणे, तसेच आंतरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी संघटन करणे आवश्यक आहे. जनजागृती ही आजच्या काळाची आवश्यकता असून जनजागृती केल्यानेच संघटन होणे शक्य आहे.

समाज धर्मशिक्षित व्हावा, यासाठी ही सभा  ! – सद्गुरु स्वाती खाडये

समाजामध्ये जागृती करणे आणि धर्मप्रसार करणे, ही काळाची आवश्यकता आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हा सनातन संस्थेचा उद्देश असून समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य सनातन संस्था अनेक वर्षे अव्याहतपणे करत आहे, असे सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी सांगितले.

समस्त वारकरी संघटना, ५०० मंदिरांचे विश्वस्त या सभेला उपस्थित रहातील. – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज

हिंदूंचे संघटन व्हावे, तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. ५ एप्रिल या दिवशी होणारी सभा या दृष्टीने महत्त्वाची आहे. – श्री. अमित गायकवाड