आधुनिक तंत्रज्ञानामुळे गोव्यातील न्यायदान प्रक्रियेला गती येईल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भारतीय न्यायसंहितेविषयीचे प्रदर्शन पहातांना मुख्यमंत्री सावंत

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – आधुनिक तंत्रज्ञानामुळे राज्यातील न्यायदान प्रक्रियेला गती येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. २७ मार्च या दिवशी पणजी येथील कला अकादमीमध्ये भारतीय न्यायसंहितेविषयी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘गेली काही वर्षे राज्य सरकारने न्यायदानाशी संबंधित खात्यांचे आधुनिकीकरण केले आहे. पोलीस, अभियोग, न्यायपालिका या खात्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणले आहे. याचा एक भाग म्हणून वेर्णा येथे आधुनिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे लवकरच उद्घाटन करण्यात येईल. या सर्व सुधारणांमुळे न्यायदानाची प्रक्रिया जलद गतीने होईल. सरकारने पोलीस खात्याला तंत्रज्ञान देण्याबरोबर त्यांच्या पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. न्यायवैद्यक विभागाला नवीन उपकरणे दिली आहेत. अभियोग खात्याच्या कार्यालयासाठी नवीन जागा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे खटल्यांचा निकाल जलद लागेल, अशी अपेक्षा आहे.’’

प्रदर्शनाविषयी डॉ. सावंत म्हणाले, ‘‘या प्रदर्शनामध्ये गुन्ह्यापासून ते न्यायालयीन निवाड्यांपर्यंतची माहिती आहे. जनतेसह विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन नक्की पहावे. विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये चांगली संधी उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे देशातील आधीची कायदे संहिता जाऊन नवीन संहिता आली आहे. त्यांनी सध्याच्या काळाला अनुकूल असे कायदे आणले आहेत. भारतीय न्याय संहितेची कार्यवाही देशात सर्वांत आधी गोव्यात झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’