
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – रोहित पवार, मनात शंका ठेवू नका. अजित पवार यांच्या अपघातामध्ये जर घातपात असेल, तर आकाश-पाताळ एक करून कुणाचा बाप असला, तरी शोधून काढू. कदाचित् तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता न्यून असेल; परंतु अजित पवार यांच्या अपघातामध्ये कुणाचा हात असेल, तर त्याचा मुडदाही खणून काढू, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली.
या वेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘अन्यांची तीव्रता अल्प आहे’, असे तुम्ही समजू नका. तुम्ही पुढे येऊन करता, तसे नेतृत्व कदाचित अन्यांमध्ये नसेल किंवा ते पुढे येऊन करत नसतील. याचा अर्थ त्यांच्यामध्ये अजित पवार यांच्याविषयी भावना नाहीत, असे नाही. या अपघाताच्या अन्वेषणात जे करावे लागेल, ते करू. कोणत्याही परिस्थितीत काही चुकीचे होऊ देणार नाही.’’
राखेच्या अंशात स्फोटकाचा अंश नाही !
अजित पवार यांचे मुंबई विमानतळावरील आणि बारामती येथील अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही चित्रण प्राप्त झाले आहे. विमानातील अपघातग्रस्तांचे सर्वांचा डी.एन्.ए.(डी.एन्.ए. म्हणजे डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक. जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डीएन्ए) अहवाल प्राप्त झाले असून ते नातेवाइकांशी जुळले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये कोणत्याही प्रकारे विषाचा अंश सापडलेला नाही. वैमानिक आणि सहवैमानिक यांनी मद्य किंवा अमली पदार्थ सेवन केले नसल्याचे चाचणीमध्ये आढळून आले आहे. अजित पवार यांचे सुरक्षारक्षक, कार्यालयातील अधिकारी आदींच्या अन्वेषणामध्ये विमानातून कोणत्याही प्रकारे स्फोटक पदार्थ नेल्याचे आढळलेले नाही. अपघातस्थळावरील राखेमध्ये कोणत्याही प्रकारे स्फोटकाचा अंश सापडलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विमान अपघात अन्वेषण ब्युरोच्या अहवालाचा अन्वेषणासाठी उपयोग करू !
केंद्रीय विमान उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोकडून अन्वेषणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर पोलीस अन्वेषणासाठी त्याचा संदर्भ घेता येईल. विमान अपघात अन्वेषण ब्युराचे महासंचालक आणि ३ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ३ अधिकार्यांचे पथकही घटनास्थळी आले होते. अन्वेषणासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक साहाय्य घेण्यात येत आहे. अन्वेषणामध्ये अमेरिकेतील तांत्रिक तज्ञही सहभागी आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र संतांची भूमी, भोंदूगिरीला स्थान नाही ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपण श्रद्धा मानणारे लोक आहोत; परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये छोटी रेष आहे. अशोक खरात याच्या प्रकरणातून अंधश्रद्धेमुळे विवेक कशा प्रकारे हरवला, हे पहायला मिळते. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. संतांनी देवाचे अस्तित्व नाकारलेले नाही. धर्म आणि श्रद्धा यांचा अर्थ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानातून सांगितला आहे. पसायदानातून त्यांनी दुष्ट प्रवृत्तींवर प्रहार केला आहे; परंतु सद्यस्थितीत देवत्व कुठे पहायला हवे, याच्या चिंतनाची वेळ आली आहे. सरकार आणि समाज यांनी यातून शिकायला हवे. महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थान नाही, असे देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा चर्चेवरील उत्तरात म्हणाले.
महाराष्ट्र मानवी बळी आणि अन्य अमानुष, अनिष्ट अन् अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध आणि निर्मूलन अधिनियमातील नियम अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्याची कार्यवाही ताकदीने केली जात आहे. जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या, तर अशोक खरात याला डॉनल्ड ट्रम्प यांचा सुरक्षा सल्लागार म्हणून त्याची नियुक्ती झाली असती. पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना टाचण्यांनी संपवले गेले असते. देशाच्या रक्षणासाठी ४-५ भोंदूबाबा पाठवले गेले असते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव