भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील कारवाई नियोजनबद्ध ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भोंदूबाबा अशोक खरात आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – भोंदूबाबा अशोक खरात याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. १० मार्च या दिवशी अन्य जिल्ह्यातील तक्रारींच्या आधारे कारवाईची सिद्धता करण्यात आली होती. भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर पोलिसांची कारवाई नियोजनबद्ध होती, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या आधारे ‘भोंदूबाबा खरात याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्याशी जोडलेले मंत्र्यांचे त्यागपत्र घ्यावे’, अशी मागणी सभागृहात केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘भोंदूबाबा अशोक खरात याने त्याच्याकडे तथाकथित शक्तीचा असल्याचा दावा करून त्याद्वारे दिशाभूल करून अनेक महिलांसमवेत दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. याविषयी अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यांना धीर दिल्यानंतर काही महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. येत्या काही दिवसांत अन्यही काही महिला तक्रार नोंदवतील. याविषयी २४ मार्च या दिवशी सभागृहात मी सखोल निवेदन करणार आहे.’’

चर्चेच्या मागणीसाठी सभागृहात गोंधळ !

भोंदूबाबा अशोक खरात याने केलेल्या फसवणुकीविषयी सभागृहात चर्चा करण्यात यावी, ही मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात केली. मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगूनही सत्ताधारी आणि महाविकास आघाडी यांच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ केला.