संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदे लागू करा ! – अधिवेशनातील मागणी

बिहार राज्यस्तराचे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

डावीकडून ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अधिवक्ता प्रभाष ठाकूर, बोलतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी

पाटलीपुत्र (बिहार) – ‘भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावे’, या अनुषंगाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ‘भारताच्या राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द काढावा, केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ हे दोन्ही कायदे पारित करावेत, भारतातील सर्व मंदिरांवरील सरकारी नियंत्रण रहित करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत’, अशा हिंदूहिताच्या अनेक ठरावांना या अधिवेशनात संमती  देण्यात आली, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी दिली.

अधिवेशनानंतर ‘आय.एम.ए. सभागृहा’त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती सांगितली. या वेळी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अधिवक्ता प्रभाष ठाकूर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

अधिवक्ता संघटनावर भर

‘भारतविरोधी विचारसरणीच्या लोकांच्या षड्यंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रभक्त अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक आहे. त्यामुळे बिहारमधील विविध जिल्ह्यांत अधिवक्ता संमेलन आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. हिंदु संघटनांना आवश्यक कायदेशीर प्रशिक्षण देऊन त्यांना धर्मकार्याकरता सक्षम केले जाईल’, अशी माहिती ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अधिवक्ता प्रभाष ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपर्क अभियान

या वेळी श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, बिहारमध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवून ‘हलालमुक्त िबहार’ अभियानाला गती देणे, नव्या हिंदु संघटनांशी संपर्क साधणे, मंदिरांना संघटित करण्यासाठी विश्वस्तांसाठी संपर्क अभियान राबवणे, अशी कार्ये केली जाणार आहेत. येणार्‍या हनुमान जयंतीच्या दिवशी गदापूजन आयोजित करून या अभियानाचा प्रारंभ केला जाईल. बिहारमधील हिंदु राष्ट्र अधिवेशनात अनेक जिल्ह्यांतील हिंदु संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ते, संत, मंदिर विश्वस्त, उद्योगपती, पत्रकार आणि संपादक उपस्थित होते.