हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

  • मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

  • हिंदुहितासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, मंदिर विश्वस्त, अधिवक्ता, डॉक्टर, उद्योजक, प्राध्यापक, विचारवंत यांची वज्रमूठ !

मान्यवरांच्या हस्ते ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती’ या सनातन संस्थेच्या ग्रंथाचे ‘ॲमेझॉन’वरील ‘ई-बुक’चे प्रकाशन

डावीकडून सद्गुरु अनुराधा वाडेकर,
भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, श्री. अभय वर्तक आणि डॉ. उदय धुरी

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंचे वंशविच्छेद, भारतातील हिंदूंवरील अत्याचार, देवतांचा अवमान, लव्ह जिहादचे संकट, धर्मांतर, गोहत्या आदी हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात संघटन आणि एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी मुंबई येथे २२ मार्च या दिवशी मुलुंड (पश्चिम) येथील पद्मावती बँक्वेट सभागृहात ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. ‘परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या अधिवेशनामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर, प्राध्यापक, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, गोरक्षक यांचा सहभाग होता.

या वेळी वैद्य उदय धुरी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटनाची आवश्यकता, हिंदु धर्मरक्षणाचे कार्य, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण, आपत्काळात करावयाची सिद्धता आदी विषयांवर विविध उद्बोधन सत्रांमध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रांत कार्य करतांना आलेले अनुभव या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले.

संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केल्यास हिंदूंचा विजय निश्चित ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था 

जगात मुसलमानांची संख्या हिंदूंच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली, तर पुढील काही वर्षांत भारत जगातील सर्वाधिक मुसलमानांची लोकसंख्या असलेला देश होईल. सध्या चालू असलेल्या युद्धामध्ये भविष्यात भारत ओढला गेला, तर देशभरात गृहयुद्ध माजेल, दंगली भडकतील. ज्यामध्ये हिंदूंची हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हिंदूंनीही अधिक मुले जन्माला घालणे, हा त्यावरील उपाय नाही. संतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केल्यास विजय निश्चितच हिंदूंचा होईल. हिंदूंनी जात-पात, पक्ष-संघटना यांची बंधने बाजूला सारून धर्मकार्यासाठी संघटित व्हायला हवे. प्रतिदिन धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे आणि प्रत्येकाने प्रतिदिन साधनेचे प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन अभय वर्तक यांनी उद्घाटन सत्रात केले.

असा झाला प्रारंभ !

१. प्रारंभी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले.

२. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक जप करण्यात आला.

३. श्री गणेशाचा श्लोक म्हणून आणि शंखनाद करून अधिवेशनाला प्रारंभ झाला.

४. पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी विश्वशांतीसाठी शांतिपाठ म्हटला.

वंदनीय उपस्थिती !

ह.भ.प. रामदास चौधरी महाराज, ह.भ.प. संतोष महाराज पवळे आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थित अधिवेशनाला लाभली.

(सविस्तर वृत्त लवकरच !)