हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

शेकडो नागरिकांचा उपक्रमात सहभाग

सिद्धगणेश हनुमान मंदिर ७० फूट रस्ता येथे सामूहिक गुढीपूजन, हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा आणि प्रभु श्रीरामचे नामस्मरण करण्यात आले.

सोलापूर – हिंदु नववर्षाच्या प्रारंभी गुढीपाडव्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत एकूण १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले. या उपक्रमामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला.

वैष्णव मारुति मंदिर (जुना घरकुल) येथे सामूहिक गुढीपूजन करतांना धर्मप्रेमी

गुढीपूजन झालेली प्रमुख ठिकाणे – मल्लिकार्जुन मंदिर, दमाणीनगर येथील श्री गणेश मंदिर परिसर, श्री गणपति मंदिर (रामदेवनगर, शेळगी), विणकर वसाहत (गांधीनगर), अशोक चौक येथील व्यंकटेश मंदिर, सिद्धगणेश हनुमान मंदिर (७० फूट रोड), नीलमनगर येथील भारतीय एकात्मता नवरात्र महोत्सव मंडळ, जुना घरकुल येथील श्री दत्त मंदिर, ब्रह्मनाथनगर, वैष्णव मारुति मंदिर (जुना घरकुल), रुद्र मारुति मंदिर, नवीन घरकुल एस् पॉईंट, नवीन घरकुल, पोषमा मंदिर (विनायकनगर), अक्कलकोट येथील रामगल्ली, तसेच अन्य स्थानिक भाग.

दमाणीनगर येथे श्री गणेश मंदिरामध्ये सामूहिक गुढीपूजन केले.

या १५ ठिकाणी ब्रह्मध्वज पूजन, प्रभु श्रीरामाची आरती, नामजप आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली. अनेक ठिकाणी प्रथमच सामूहिक गुढी उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. जुना घरकुल (डी-२ ग्रुप) येथील श्री दत्त मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करत ब्रह्मध्वज पूजन, श्रीरामाची आरती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली. या वेळी श्री. यश मुगड्याल, कु. शिवलीला गुब्याड, तसेच ‘स्वरांजली न्यूज चॅनल’चे निवेदक श्री. गिरीश गोसकी उपस्थित होते. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलेल्या युवतींनी पुढाकार घेतला असून उपस्थितांनी उत्साहात जयघोष करत धर्मरक्षणासाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प केला. ‘सण-उत्सव शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरे केल्यास समाजात संघभाव, प्रेमभाव आणि एकात्मता वाढते’, असा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.